विद्यमान राज्यपाल वजूभाई वाला यांची घेणार जागा : लवकरच शपथविधी होणार : मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
प्रतिनिधी /बेंगळूर
केंद्रीय मंत्रिमंडळ पुनर्रचनेची चर्चा होत असतानाच नव्या राज्यपालांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकाचे 19 वे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतींनी मंगळवारी नेमणुकीची अधिसूचना जारी केली आहे.
सप्टेंबर 2014 पासून मूळचे गुजरातमधील वजुभाई वाला यांनी कर्नाटकाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला तरी नूतन राज्यपालांची नेमणूक न झाल्याने तेच या पदाचे कामकाज सांभाळत होते. अखेर मंगळवारी 73 वर्षीय थावरचंद गेहलोत यांची नवे राज्यपाल म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते राज्यसभेचे विद्यमान सदस्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याचे मंत्री आहेत.
18 मे 1948 रोजी मध्यप्रदेशमधील रुपटा या गावी थावरचंद गेहलोत यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. प्रारंभी रा. स्व. संघामध्ये ते सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भारतीय मजदूर संघटनेचे खजिनदार, सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी हाताळली होती. 1968 ते 1971 या कालावधीत कामगार चळवळीत सहभागी असताना त्यांना अनेकवेळा पोलिसांनी अटक केली होती. आणीबाणीच्या काळातही त्यांना कारावास भोगावा लागला.
1996 ते 2009 या कालावधीत शाजापूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीत निवडून आले. डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. 2014 मध्ये त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली होती. याच दरम्यान त्यांनी सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याचीही धुराही सांभाळली आहे.
कर्नाटक भाजप प्रभारीपदही भूषविले होते
यापूर्वी गेहलोत यांच्यावर भाजपचे कर्नाटक राज्य प्रदेश प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांनी भाजपचे कर्नाटक प्रभारी म्हणून काम केले होते. या कालावधीत त्यांनी भाजप पक्षसंघटना आणि प्रचाराला प्राधान्य दिले होते.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा…
थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकाच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी त्यांचे ट्विटरवर शुभेच्छा देत स्वागत केले आहे. अनुभव आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असणाऱया गेहलोत यांच्यामुळे कर्नाटकाला फायदा होणार आहे. मावळते राज्यपाल वजूभाई वाला यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना धन्यवाद देत असल्याचेही येडियुराप्पा यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.
प्रल्हाद जोशींकडून दिल्लीत अभिनंदन… कर्नाटकाचे नूतन राज्यपाल म्हणून थावरचंद गेहलोत यांची नेमणूक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले.