वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने नव्या पिढीच्या खेळाडूंतील युद्ध जिंकून ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव केला. रविवारी जेतेपदासाठी त्याची लढत सर्बियाच्या जोकोविचशी होणार आहे.
थिएमने युवा खेळाडू व्हेरेव्हवर चुरशीच्या लढतीत 3-6, 6-4, 7-6 (7-3), 7-6 (7-4) अशी मात केली. या लढतीवेळी पावसाचा व्यत्यय आला तर काही वेळ विद्युत प्रकाशझोत बंद पडला आणि इतर नाटय़ही घडले. पाचवे मानांकन असलेल्या थिएमने अडखळत सुरुवात केली. पण नंतर त्याने महत्त्वाचे गुण मिळविताना धाडशी खेळ केला. निर्णायक टायब्रेकमध्ये त्याने दोन जबरदस्त फोरहँडचे विजयी फटके मारत तीन मॅचपॉईंट्स मिळविले आणि क्रॉस कोर्ट व्हॉलीवर विजय मिळवित अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले. मागील दोन प्रेंच ओपन ग्रँडस्लॅममध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस निर्णायक सेट गमविल्याने नदालकडून त्याला पराभूत व्हावे लागले होते. जोकोविच, नदाल, रॉजर फेडरर या ‘बिग थ्री’ टेनिसपटूंनी अनेक वर्षे ग्रँडस्लॅम स्पर्धांवर राज्य केले. आता ग्रँडस्लॅम जिंकणारा 1990 च्या दशकात जन्मलेला पहिला खेळाडू होण्याचा मान थिएम मिळवितो का, हे रविवारी पहावयास मिळणार आहे.