किकी बर्टेन्स, निशिकोरी, सारा इराणी यांचीही आगेकूच, मरे, सिलिक, कोन्टा पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत झेकची पेत्र क्विटोव्हा, अमेरिकेची सोळावर्षीय कोको गॉफ, सारा इराणी, किकी बर्टेन्स, पुरुषांमध्ये डॉमिनिक थिएम, स्टॅनिसलास वावरिंका, जपानचा केई निशिकोरी यांनी दुसरी फेरी गाठली तर जोहाना कोन्टा, अँडी मरे, मारिन सिलिक, डॅन इव्हान्स यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
महिला एकेरीत सातव्या मानांकित 30 वर्षीय क्विटोव्हाने ओशीन डोडिनचा 6-3, 7-5 असा पराभव केला. दोन वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱया क्विटोव्हाने पहिल्या सेटमध्ये आपल्या सर्व्हिसवर फक्त दोन गुण गमविले. तिची पुढील लढत इटलीची जस्मिन पाओलिनी किंवा स्पेनची ऍलिओना बेलसोव्हा यापैकी एकीशी होईल. अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफने गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठलेल्या ब्रिटनच्या जोहाना कोन्टावर 6-3, 6-3 अशी मात केली. प्रेंच ओपन स्पर्धेत गॉफ पहिल्यांदाच खेळत आहे. तिची पुढील लढत इटलीच्या मार्टिना ट्रेविसनशी होणार आहे. थंड हवामानामुळे दोन्ही सामन्यावेळी प्रेक्षकांची किरकोळ उपस्थिती होती. याशिवाय हॉलंडच्या किकी बर्टेन्सने कॅटरिना जेवत्स्काचा 2-6, 6-2, 6-0, इटलीच्या सारा इराणीने ऑलिम्पिक चॅम्पियन मोनिका पुइगचा 6-2, 6-1 असा पराभव केला. इराणी व बर्टेन्स यांच्यात पुढील लढत होईल.
सिलिक, मरे पराभूत
पुरुष एकेरीत अमेरिकन ओपन विजेत्या तिसऱया मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने पहिला अडथळा पार करताना मारिन सिलिकचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. सिलिक सध्या 40 व्या क्रमांकावर असून येथे तो बिगरमानांकित होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वावरिंका व मरे या दोन जुन्या योद्धय़ांची जुगलबंदी पहावयास मिळण्याची अपेक्षा केली होती. पण वावरिंकाने मरेचा एकतर्फी धुव्वा उडविल्याने सर्वांचीच निराशा झाली. वावरिंकाने 6-1, 6-3, 6-2 असा विजय मिळविला. 2017 मध्ये या स्पर्धेत दोघांची उपांत्य फेरीत शेवटची गाठ पडली होती. पाच सेट्समध्ये रंगलेली ती झुंज वावरिंकाने जिंकली होती. जपानच्या निशिकोरीला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने दोन सेट्स 6-1 असे गमविले. पण या वर्षातील पाचवा सामना खेळणाऱया निशिकोरीने अखेर 1-6, 6-1, 7-6 (7-3), 1-6, 6-4 असा विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. हाताच्या कोपरावर झालेली शस्त्रक्रिया आणि नंतर कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला अमेरिकन ओपनमध्ये खेळता आले नव्हते. त्याने ग्रँडस्लॅममध्ये आतापर्यंत पाच सेट्सचे 30 सामने खेळले असून त्यापैकी 24 लढती त्याने जिंकल्या आहेत. त्याची लढत इटलीच्या स्टेफान ट्रव्हग्लियाशी होणार आहे.