पुलाची शिरोली/ वार्ताहर :
गेले अडीच महिने शहरात मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी रोटरी स्मार्ट सिटी क्लबचा अभिनव उपक्रम.
रोटरी क्लब, नागरिक, सामाजिक संघटना यांनी सोशल मीडिया, तसेच रस्त्यावर उतरून युद्ध पुकारले आहे. देशात प्रथमच कोल्हापूरने पेरलेले हे थुंकी विरोधी चळवळीचे बीज राज्यात रुजेल असा विश्वास रोटरीचे अध्यक्ष बाबा जांभळे यांनी व्यक्त केला.
रविवारी सकाळी रोटरी स्मार्ट सिटी क्लबचे पदाधिकारी आणि अँटी स्पिट मोव्हमेंट च्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबवली.
“थुंकी मुक्त कोल्हापूर निरोगी कोल्हापूर”, “थुंकीचंद, गो बॅक”, “थुंकी चंद ,हाय हाय”, “थुंकीचंदांचा निषेध असो”, “सार्वजनिक ठिकाणी कसेही थुंकणे, गलिच्छ जिणे,लाजिरवाणे!,”हे आमचं कोल्हापूर हाय, हितं थुकलेलं चालत नाय “.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. थुंकी वीर आढळल्यास त्याला जागा पुसायला लावली जात होती.महापालिका सक्रिय झाली आहेच, पण शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधात कडक कारवाई करावी . अशी मागणीही नागरिक, सामाजिक संस्था कडून यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कडून जन जागृती बॅनर्स, स्टिकर्स वितरण करण्यात आले. तसेच परिसरातील दुकानामध्ये, बस स्थानकातील बसेस वर प्रबोधन करून स्टिकर्स लावण्यात आले. रोगप्रसार,सामाजिक स्वच्छता व आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषयाबाबत नागरिक तसेच विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.
या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीच्या कोल्हापूर च्या कार्यकर्त्यांसह,स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाबा जांभळे भागातील नगरसेवक आशिष ढवळे, पानपट्टी संघटनेचे अरुण सावंत, फेरीवाले संघटनेचे कॉ. दिलीप पोवार, आरटीओ अधिकारी प्रदीप शिंगारे, फेरीवाले संघटना, नागरिक , प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाचे नेतृत्व बाबा जांभळे, दीपा शिपुरकर,राहुल राजशेखर,राष्ट्रवादी युवा अध्यक्ष महेंद्र चव्हाण, सतिश्चंद्र कांबळे,अभिजीत गुरव,सुनीता मेंगाणे, महेश ढवळे,विजय धर्माधिकारी,गीता हसुरकर,सारिका बकरे,सागर बकरे,भानुदास डोईफोडे,वारणा वडगांवकर यांनी केले