सातारा : जिल्ह्यात थॅलेसिमिया आजाराचे 107 रुग्ण असून अशा रुग्णांना त्याच्या शरीरातील क्षमतेनुसार रक्त बदलणे गरजेचे असते. राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व खासगी रक्तपेढयांना अशा रुग्णांना मोफत रक्त देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, साताऱ्यातील एका ब्लड बँकेने म्हसवड येथील 12 वर्षीय थैलेसिमिया रुग्णाला रक्त देण्यास नकार देत तुम्ही रक्त डोनेट करा मग आम्ही देऊ, असे उत्तर दिले असल्याचा ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे.
थॅलेसिमिया रुग्णाच्या शरीरातील क्षमतेप्रमाणे दोन दिवस ते सहा महिन्यात रक्त चेंज करावे लागते. राज्य रक्त संक्रमण परिषदेने जिल्ह्यातील खासगी रक्तपेढयांना अशा रुग्णांसाठी मोफत रक्त देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे असतानाही सातारा शहरातील एक ब्लड बँक अशा रुग्णांना रक्त देत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. म्हसवड येथीलएका 12 वर्षाच्या मुलाला थॅलेसिमिया आजाराने पछाडले आहे. त्याला महिन्यातून रक्त चेंज करावे लागते. असे असताना या मुलाच्या आजीने साताऱ्यातील एका ब्लड बँकेस दूरध्वनीवरून बी पॉझिटिव्ह रक्त लागणार असल्याचे सांगितले.
त्यावेळी आमच्याकडे रक्त उपलब्ध नाही, दुसऱ्या ब्लड बँकेतून घ्या, त्यांचा नुकताच कॅम्प झालाआहे, असे सांगितले. त्यावर त्या महिलेने गेल्या 4 महिन्यात असेच सांगत असल्याचे म्हटले. त्यावर ब्लड बँकेतील महिला कर्मचाऱ्याने तुम्ही येथे येऊन ब्लड डोनेट करा, मग रक्त देते असे उलट उत्तर दिले. यावर या महिलेने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्याकडे तक्रार करत संबंधित ब्लड बँकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.