न बोलता-न टाइप करता पार पाडले कृत्य
ऑस्ट्रेलियात एका पक्षाघातग्रस्त रुग्णाने हातांचा वापर न करता, न बोलता आणि शरीराची हालचाल न करता पहिल्यांदाच एक स्वतःचा मेसेज लिहिला आहे. त्याने हा मेसेज ट्विटरवरही शेअर केल्याचे पाहून प्रत्येकजण दंग आहे.
या पक्षाघातग्रस्त रुग्णाचे नाव फिलिप ओ कीफ असून ते 62 वर्षांचे आहेत. फिलिप यांच्या शरीराचा वरचा भाग पूर्णपणे अर्धांगवायूने ग्रस्त आहे. ते मागील 7 वर्षांपासून एमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिसने पीडित असल्याने त्यांच्या शरीराच्या वरील भागातील अवयव हालचाल करण्यास असमर्थ आहेत. हा मोटर न्यूरॉन डिसीजचाच एक प्रकार आहे. ‘हॅलो, वर्ल्ड! छोटा ट्विट, मोठी अचिव्हमेंट’ असा हा ट्विट आहे. हा ट्विट फिलिप यांनी सिंक्रॉन कंपनीचे सीईओ थॉमस ऑक्स्ली यांच्या ट्विटर हँडलद्वारे केला आहे. याचबरोबर फिलिप यांनी ‘मेंदूत पेपरक्लिपच्या प्रत्यारोपणासाठी’ डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
सिंक्रॉन कंपनीने फिलिप यांच्या मेंदूत मायक्रोचिप इम्प्लांट करून त्यांच्या विचारांना शब्दांमध्ये बदलण्याची शक्ती दिली आहे. फिलिप यांच्या मेंदूत इम्प्लांट करण्यात आलेली मायक्रोचिप मेंदूंच्या संकेतांना वाचू शकते, त्यानंतर या संकेतांचे विश्लेषण करते आणि मेंदूंच्या निर्देशांना समजून घेत त्यांना शब्दांमध्ये रुपांतरित करते.
फिलिप यांनी या प्रणालीला अत्यंत आश्चर्यकारक ठरविले आहे. जेव्हा पहिल्यांदा या तंत्रज्ञानाविषयी ऐकले तेव्हा अत्यंत आनंद झाला. या तंत्रज्ञानामुळे माझे काम सोपे होणार असल्याचा अंदाज आला होता असे त्यांचे म्हणणे आहे.
या तंत्रज्ञानाद्वारे शारीरिक आणि मानसिक अक्षमतेमुळे इतरांवर अवलंबून असलेल्या लोकांना सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश आहे. लोकांसाठी विचारांद्वारे काही लिहिण्याची किंवा ट्विट करण्याचा मार्ग सोपा करू शकेन अशी अपेक्षा करत असल्याचे उद्गार थॉमस ऑक्सली यांनी काढले आहेत.