विश्व बॅडमिंटन संघटनेचा निर्णय, जानेवारीत होणार टूर फायनल्स स्पर्धा
वृत्तसंस्था/ ओडेन्स
डेन्मार्कमध्ये होणारी थॉमस व उबेर चषक अंतिम स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने सोमवारी जाहीर केले.
दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा आधीच्या नियोजनाप्रमाणे या वर्षीच्या मे महिन्यात होणार होती. पण कोव्हिड 19 महामारीच्या प्रकोपामुळे ती ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. पण डेन्मार्क सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ऑगस्टमधील स्पर्धाही पुन्हा एकदा ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. 3-11 ऑक्टोबर हा कालावधी यासाठी निश्चित करण्यात आला होता. पण दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, थायलंड यांनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ती पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय विश्व संघटनेला घ्यावा लागला. ‘आता पुढील वर्षीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 41 व्या आठवडय़ात ही स्पर्धा आरहस, डेन्मार्क येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या पुढील म्हणजे 42 व्या आठवडय़ातच डेन्मार्क ओपन स्पर्धा घेतली जाईल,’ असे बीडब्ल्यूएफने सांगितले.
2021 वर्ल्ड टूर मोसमाची सुरुवात आशियाई टप्प्याने होणार असून गेल्या नोव्हेंबरमधील ही स्पर्धा आता येत्या जानेवारीत घेतली जाणार आहे. थायलंडमध्ये लागोपाठ दोन स्पर्धा घेण्यात येणार असून 21 जानेवारीपासून पहिली स्पर्धा झाल्यानंतर वर्ल्ड टूर फायनल्स 27-31 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. चायना मास्टर्स, थायलंड मास्टर्स, थायलंड ओपन या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कोरिया येथील सुपर 300 स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक पात्रतेचा कालावधी मार्चमधील स्विस ओपन स्पर्धेने सुरू होईल आणि भारतात मे मध्ये होणाऱया इंडिया ओपन स्पर्धेपर्यंत हा कालावधी असेल. टोकियो ऑलिम्पिक पात्रतेची घोषणा रेस टू टोकियो रँकिंगच्या आधारे 18 मे 2021 रोजी करण्यात येणार असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने स्पष्ट केले.
सुपर 1000 स्पर्धा आयोजकांना बक्षीस रकमेत कपात करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. 11 लाखावरून 8.5 लाख डॉलर्स अशी कपात ते करू शकतात तर सुपर 750 स्पर्धांना 7.5 लाखावरून 6 लाख डॉलर्स इतकी कपात त्यांना करता येणार आहे. सुपर 300 व सुपर 500 स्पर्धांची पात्रता फेरी घेतली जाणार नाही. कोव्हिड 19 चे बेभवरशाचे स्वरूप पाहता खेळाडू व पदाधिकाऱयांची चाचणी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही फेडरेशनने सांगितले.