प्रतिनिधी/ निपाणी
नियती किती क्रूर असते याची प्रचिती देणारा प्रसंग निपाणीतील बागवान कुटुंबीयांवर शुक्रवारी ओढावला. थोरल्या भावाच्या मृत्यूची बातमी समजताच तासाभरातच धाकटय़ा भावानेही प्राण सोडल्याची घटना बेळगावात घडली. जावेद बसीर बागवान (वय 55) असे थोरल्या भावाचे तर आय्याज बसीर बागवान (वय 46) असे धाकटय़ा भावाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे निपाणीतील बागवान गल्लीनजीकच्या तवटे गल्लीतील असणारे जावेद हे सध्या बेळगाव येथील वीरभद्र नगरात स्थायिक होते. 5 भावांमध्ये सर्वात मोठे होते. गेल्या आठवडय़ात त्यांची आई रुबजा बसीर बागवान यांचे निपाणीत हृदयविकाराने निधन झाले होते. याचा जावेद यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना गेल्या आठवडाभर रक्तदाबाचा त्रास होत होता.
दरम्यान शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास प्रार्थनेसाठी उठल्यानंतर जावेद यांना अचानक रक्तदाब कमी होऊन हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान भाऊ जावेद यांचे निधन झाल्याचे समजताच वीरभद्र नगरातच सासरवाडीत असणाऱया धाकटा भाऊ आय्याज यांनाही धक्का बसला यातच त्यांचाही रक्तदाब कमी होऊन हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या तासाभरातच दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने निपाणीत एकच हळहळ व्यक्त होत आहे. जावेद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. तर आय्याज यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे.