ऑनलाईन टीम / चरखी दादरी (हरियाणा) :
दंगल गर्ल गीता आणि बबिता फोगट यांची मामे बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली आहे. रितीका फोगटने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितिका फक्त 17 वर्षांची होती. रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. 14 मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्ता एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
दरम्यान, गीता आणि बबीता या स्टार कुस्तीपटूंची मामेबहीण असलेल्या रितिकालाही फोगाट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचे होते. त्यासाठी ती गेली 5 वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. स्पर्धेदरम्यान तेदेखील उपस्थित होते. रितिका महावीर फोगट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी होती.
रितिकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. त्यानंतर रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आले.