सावंतवाडी पोलिसांची शक्कल
सावंतवाडी:
एक एप्रिलपासून शहरी भागात दुचाकांना बंदी घालण्यात आली असतानाही पोलिसांनी विनाकारण दुचाकी चालविणाऱयांना दंडात्मक कारवाईबरोबरच कवायती करून घेतल्या. मंगळवारी रात्री फिरणाऱया दुचाकीस्वारांना पोलिसांनी उठाबशा काढण्यास लावल्या.
लॉकडाऊन व संचारबंदी असताना विनाकारण दुचाकीने फेरफटका
मारणाऱयांना आवरण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबतच उठाबशा काढण्यास लावण्याची वेळ पोलिसांवर
आली आहे. बुधवारी सावंतवाडी शहरात कडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. तपासणी नाक्यावर
दुचाकी पार्क करून पायी बाजारात खरेदीसाठी पाठविण्याची कारवाई सुरू केली. त्यामुळे
अनेकजण पायी जात होते.
ओळखपत्र, वाहतूक पासची खात्री केल्यानंतरच
वाहने सोडण्यात येत होती. बनवेगिरी करणाऱया दुचाकीस्वारांना हुसकावून लावण्यात येत
होते. त्यामुळे पायी जाणाऱयांची वर्दळ दिसत होती. शहरात बारा ठिकाणी पोलिसांनी तपासणी
पथके तैनात ठेवली होती. दुपारी व रात्रीच्यावेळीही नाकी तैनात ठेवून कारवाई करण्याचे
आदेश देण्यात आले आहेत.
मच्छीमार्केट येथे गर्दी
मच्छीमार्केट परिसरात भाजीपाला दुकाने गर्दी करून लावल्याने दुचाकीस्वारांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. हा प्रकार पोलीस अधिकाऱयांच्या निदर्शनास येताच दुकानदारांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तरीही गर्दी कमी न झाल्याने पोलिसांना दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागला. अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सुरू राहिल्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या निदर्शनास येताच दोन दुकान मालकांवर कारवाई केली. या दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी शहरात केलेल्या कारवाईत 66 दुचाकीस्वारांवर कारवाई करून 15 हजार 200 रुपये दंडात्मक कारवाई केली. विनाकारण दुचाकीने फिरणाऱयांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करून तीन दुचाकी व एक कार जप्त करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या नेतृत्वाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.