मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेने सर्व थकबाकीदारांना जाहीर सूचना देऊन कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी व अन्य थकबाकी भरण्यास सांगितले आहे. थकबाकीदारांना त्यांची थकबाकी चुकती करण्यास या वर्षाच्या समाप्तीपूर्वी मुदत देण्यात आली आहे.
मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी थकबाकीदारांना माहिती देताना सांगितले आहे की, 31 डिसेंबरपूर्वी देय थकबाकी न भरल्यास अशांना हेतुपुरस्सर चुकवेगिरी करणारे असे मानण्यात येईल. त्यानंतर लीज करार रद्द करणे, निलंबित करणे तसेच आस्थापन सील करणे यासह सर्व प्रकारची कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क मडगाव पालिकेला राहील.
असे अनेक थकबाकीदार आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून थकबाकी भरलेली नाही. म्हणून त्यांच्यासाठी हे स्मरणपत्र असून थकबाकी वरील दिलेल्या मुदतीत चुकती न केल्यास कठोर निर्णय घेणे भाग पडेल, असा इशारा या नोटिसीतून देण्यात आला आहे. बरेच नागरिक कर भरणा करण्याच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात. परंतु काहींना स्मरणपत्रे हवी असतात. तथापि कोविड-19 च्या परिस्थितीमुळे वैयक्तिक नोटिसा दिल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी हेच स्मरणपत्र मानून थकबाकी भरावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
थकबाकीसंदर्भात काही वाद असल्यास 30 दिवसांच्या कालावधीत पालिकेला कळविले जाऊ शकते. कागदपत्रे तपासून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नोटिसीत स्पष्ट केले आहे. पालिकेचे कर हे वर्षातून एकदा भरायचे असतात. इतर कर वा शुल्कांसारखे ते दर महिन्याला भरावे लागत नाहीत. तरीही पालिकेला याबाबतीत सापत्नभावाची वागणूक दिली जाते, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.