रुग्णसंख्येत झपाटय़ाने भर, उपचारांबाबत दिरंगाईमुळे परिस्थिती चिघळली, आगामी 2 महिने निर्णायक ठरणार
वृत्तसंस्था / रिओ-डी-जानेरो
आफ्रिकेपाठोपाठ आता दक्षिण अमेरिका हा कोरोना विषाणूचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, पेरु, मेक्सिको, चिली, उरुग्वे आदी देशांमध्ये रुग्णसंख्या दर दहा दिवसाला दुप्पट याप्रमाणात वाढत आहे. दक्षिण अमेरिकेत गरिबीचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने उपचारांकडे सर्वसामान्य जनतेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रबळ राष्ट्रांनी या खंडासाठी भरीव अर्थसाहाय्य केले पाहिजेत, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
ब्राझिलमध्ये सध्या जगातील दुसऱया क्रमांकाची कोरोना रुग्णसंख्या आहे. त्यात प्रतिदिन 2 हजाराची सरासरी भर पडत आहे. ब्राझिलच्या प्रशासनाने स्थितीची गंभीरता लपवून ठेवल्याचा आरोप होत आहे. लॉकडाऊन घोषित करण्यात केलेली दिरंगाई आणि अपुरी वैद्यकीय व्यवस्था यामुळे या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उरुग्वे आणि पेरु या दोन छोटय़ा देशांमध्ये प्रारंभी स्थिती नियंत्रणाखाली होती. तथापि, जूनच्या प्रारंभापासून येथे रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या देशांमधील कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे मानण्यात येत असून दोन्ही देशांची आरोग्य यंत्रणा स्थिती नियंत्रणाखाली आणण्यास निष्प्रभ ठरली आहे.
अर्जेंटिनात स्थिती त्यातल्या त्यात बरी
दक्षिण अमेरिकेतील दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा देश असणाऱया अर्जेंटिनामध्ये मात्र तुलनेने परिस्थिती चांगली असल्याचे दिसून येते. येथे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांहून अधिक आहे. तसेच बरे होणाऱया रुग्णांची संख्याही मोठी आहे. अर्जेंटिना प्रशासनाने प्रारंभापासून कठोर पावले उचलल्यामुळे स्थिती नियंत्रणात राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. तथापि, अन्य देशांतून या देशात येणाऱया प्रवाशांची संख्या नियंत्रणात न ठेवल्यास येथेही पुन्हा उदेक होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आफ्रिकेत इजिप्त आघाडीवर
आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील देशांमध्ये इजिप्तमधील स्थिती सर्वाधिक खराब असल्याचे आढळून येत आहे. या देशात चाचणीचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याने अनेक रुग्ण शोधले गेलेले नाहीत. त्यांचा समाजामध्ये वावर होत असल्याने विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही कोरोनाचा उदेक झपाटय़ाने होत असून या देशाच्या अंतर्भागामध्ये अद्यापही कोरोनाच्या प्रसाराविषयी जनतेचे प्रबोधन झालेले नसल्याचे दिसून येते.
पाकमध्ये 136 मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेले दहा दिवस रुग्णसंख्या प्रतिदिन सरासरी साडेचार हजारने वाढत आहे. सध्या एकंदर रुग्ण 1 लाख 65 हजार 062 असून मृतांची संख्या 3 हजार 229 आहे. रुग्णसंख्येच्या मानाने मृतांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती कितीतरी अधिक असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनेक रुग्णांच्या अहवालात मृत्यूचे अन्य कारण दिले जात असल्याचा आरोप तज्ञांनी केला आहे. या देशाच्या सिंध प्रांतात सर्वाधिक 62 हजार 269 रुग्ण असून त्या खालोखाल पंजाब प्रांतात 61 हजार 678 रुग्ण आहेत.
नेपाळमध्ये 8 हजार पार
काठमांडू : दक्षिण आशिया भागातील देशांमध्ये सर्वात कमी रुग्णसंख्या असणाऱया नेपाळमध्येही कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. शुक्रवारी एका दिवसात 426 नवे रुग्ण आढळून आले असून हा गेल्या पंधरा दिवसातील उच्चांक आहे. देशातील एकंदर रुग्णसंख्या 8 हजार 274 झाली असून देशाच्या 77 पैकी 74 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सांगण्यात आले. त्या देशात चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहेत.
फ्लोरिडा प्रांतात उदेक
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दक्षिण भागात असणाऱया फ्लोरिडा प्रांतात गुरुवारी एकाच दिवशी 3 हजार 207 रुग्ण आढळून आले आहेत. या उदेकामुळे प्रशासन चिंतेत असून अतिरिक्त उपाययोजना वेगाने केल्या जात आहेत. गुरुवारचा आकडा आतापर्यंतचा एक दिवसातील सर्वाधिक आहे. या प्रांतात आतापर्यंत 23 हजार 327 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 15 हजारहून अधिक बरे झाले आहेत.
ऍपचे प्रयत्न सोडले
लंडन : कोरोनाबाधित रुग्णांचे टेसिंग करणारे मोबाईल ऍप तयार करण्याचा प्रयत्न ब्रिटनने अर्ध्यावरच सोडला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे ऍप तयार करण्यामध्ये म्हणावे तसे यश येत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता ऍपऐवजी गुगल आणि ऍपल यांच्या साहाय्याने नवी सर्वंकष यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर्मनीमध्ये मात्र यशस्वीरीत्या ऍपची निर्मिती करण्यात आली. असून साधारणत: एक कोटी लोकांनी ते डाऊनलोड केल्याची माहिती देण्यात आली.
चीनमध्ये 37 नवे रुग्ण
बीजिंग
: कोरोना विषाणूचा उदेक पूर्णत: नियंत्रणात आल्याचा दावा करणाऱया चीनमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी एका दिवसात 37 नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी 25 राजधानी बीजिंगमधील आहेत. त्यामुळे बीजिंगचे दहा आणखी भाग लॉकडाऊनमध्ये आणण्यात आले आहेत. गुरुवारी चीनमध्ये 28 नवे रुग्ण आढळले होते. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी दिसत असली तरी ही दुसरी लाट असल्यामुळे चीनच्या विविध शहरांमधील प्रशासनांनी कठोर उपाय अवलंबिण्यास प्रारंभ केला आहे. बीजिंगमधील महत्त्वाच्या बाजारपेठा अद्यापही बंद आहेत. आतापर्यंत 78 हजार 398 रुग्णांना घरी पाठविण्यात आले असून 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे.