ब्राझील आघाडीवर, खंडातील सर्वच देशांमध्ये चिंताजनक परिस्थिती, जागतिक रूग्णसंख्या अडीच कोटीच्या जवळ
दक्षिण अमेरिकेत कोरोना बाधेचा कहर सुरू आहे. आता या खंडातील एकंदर रूग्णसंख्येने 70 लाखांचा आकडा पार केला असून एकटय़ा ब्राझील देशात यातील जवळपास दोन तृतियांश रूग्ण आहेत. याशिवाय चीली, पेरू, युरूग्वे, अर्जेंटिना, मेक्सिको इत्यादी देशांमध्ये प्रतिदिन रूग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये या खंडात प्रतिदिन रूग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत होती. तथापि, अचानक या आठवडय़ाच्या प्रारंभापासून रूग्णसंख्या वाढू लागली आहे. ही तिसरी लाट असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. अद्याप किमान एक वर्षभर या खंडाला या संकटाशी झुंजावे लागेल, अशी अनुमाने व्यक्त होत आहेत. ब्राझील देशात प्रति दशलक्ष रूग्णसंख्येत एकाएकी वाढ झाली आहे. कोरोना नियंत्रणाखाली येत आहे, अशा प्रचारामुळे लोक निष्काळजी राहिल्याने पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असल्याची तज्ञांची माहिती आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढवा
दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना आणि ब्राझील हे दोन देश त्यातल्या त्यात प्रगत आहेत. या देशांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. तसेच विलगीकरणाच्या सुविधाही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही ब्राझीलमध्ये स्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. तसेच अर्जेंटिनात तुलनेने स्थिती बरी असली तरी ती केव्हा बिघडेल हे सांगता येणार नाही, असे त्या देशातील आरोग्य तज्ञ म्हणतात. परिणामी, या देशातील नागरीकही धास्तावलेल्या मनःस्थितीत आहेत. इतर देश आर्थिक दृष्टय़ा फारसे प्रगत नाहीत. विशेषतः मेक्सिको, पेरू आणि युरूग्वे या देशांमध्ये चाचण्या फारशा होत असूनही रूग्णसंख्या मोठी आहे. यारून तेथे परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना केली जाऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले या देशांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. याकामी जगाने त्यांना साहाय्य करावे असे आवाहन आरोग्य संघटनेने केले आहे. दक्षिण अमेरिकेत एकंदरीतच जगाच्या तुलनेत चाचण्या फारच कमी होत आहेत. ही स्थिती बदलण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
या आठवडय़ात 85 हजार
या खंडात या आठवडय़ाच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये प्रतिदिन 85 हजार रूग्णांची वाढ होत आहे. त्यापूर्वीच्या आठवडय़ात ते 77 हजारहून अधिक होते. चीली देशाने सर्व रूग्णालये सरकारच्या ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. मात्र याला खासगी रूग्णालयांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे.
लसीची चाचणी
ब्रिटनने तयार केलेल्या लसीची चाचणी करण्याचा निर्णय मेक्सिकोने घेतला आहे. मात्र यात फारशी प्रगती दिसून येत नाही. स्वतःवर प्रयोग होऊ देण्यास नागरीक कमी संख्येने येत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लसीची चाचणी केली जाऊ शकत नाही, असे दिसत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी तेथील सरकार प्रयत्नशील आहे. नागरीकांना अर्थसाहाय्यही देऊ करण्यात आले आहे.
किमान 200 कोटी डॉलर्स आवश्यक
दक्षिण अमेरिकेतील देशांना कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच्या मूलभूत सुविधा तयार करण्यासाठी किमात 200 कोटी डॉलर्सच्या तातडीच्या अर्थसाहाय्याची आवश्यकता आहे. धनवान देशांनी ते उलब्ध करून द्यावे असे आवाहन जागतिक संघटनांनी व मानवाधिकार संघटनांनी केले आहे. काही देश जागतिक वित्तसंस्थांकडू कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. तथापि, त्यामुळे वित्तीय तूट वाढणे आणि आंतराष्ट्रीय पत कमी होणे हे धोके आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी या देशांवर तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.
अभ्यासासाठी अर्थसाहाय्य
लंडन : कोरोनाविरूद्धची रोगप्रतिकारशक्ती किती प्रमाणात विकसीत झाली आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनने त्या देशातील विविध संस्थांना 84 लाख पौंडाचे अर्थसाहाय्य दिले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना पुन्हा या रोगाची बाधा होऊ शकते का, तसेच होत असेल तर किती प्रमाणात यावर या संस्था संशोधन करत आहेत. काही रूग्णांमध्ये पुन्हा बाधा होण्याचा प्रकार दिसून आला आहे. मात्र सध्यातरी हे प्रमाण अत्यल्प असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
मृत 1.80 लाखपार
वॉशिंग्टन : कोरोनामुळे मृत झालेल्यांची एकंदर संख्या अमेरिकेत आता 1 लाख 80 हजाराच्या पार गेली आहे. शिवाय आता तेथील शाळा सुरू होत असल्याने नव्या कोरोना लाटेशी झुंजण्यासाठी विविध प्रातांची प्रशासने सज्ज होत आहेत. अमेरिकेच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रातांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळेही रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. बाधितांचे प्रमाण चाचणी संख्येच्या 30 टक्के इतके मोठे असणे हे चिंताजनक मानले जात आहे.
प्रतिदिन 100 हून कमी
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात आता कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. येथील व्हिक्टोरिया प्रांतात पुढील आठवडय़ापासून प्रतिदिन 100 हून कमी रूग्ण नोंद केले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये या प्रांतात 113 नवे रूग्ण आढळून आले आहेत. या देशाच्या इतर प्रातांमध्ये स्थिती याहीपेक्षा अधिक चांगली आहे. तरीही ऑस्ट्रेलियाची कमी लोकसंख्या पाहता ही संख्याही मोठी असून दक्षता घ्यावीच लागणार असे प्रशासनाने म्हटले आहे.
कडक निर्बंध कायम
सोल : रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने दक्षिण कोरिया देशाने सामाजिक अंतराचा नियम अधिक कठोरपणे क्रियान्वित राहील असे स्पष्ट केले आहे. हा नियम किमान आणखी एक आठवडा कायम राहणार आहे. हे नियम फेज 2 या नावाने ओळखले जात आहेत. रूग्णसंख्या पुन्हा वाढीला लागली असूनही फेज 3 ही सर्वात कठोर नियमावली लागू करण्याचा प्रशासनाचा विचार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. हा शेवटचा उपाय म्हणून राखून ठेवण्यात आला आहे.
अवघे पाच रूग्ण
सिंगापूर : सिंगापूरमध्ये कोरोना स्थिती सुधारत असून हा देश लवकरच कोरोनामुक्त होईल अशी शक्यता आहे. शुक्रवारी येथे अवघे पाच नवे रूग्ण आढळून आले. त्यापैकी मूळनिवासी केवळ दोन आहेत. अधिकतर रूग्ण बाहेरच्या देशातून आलेले आहेत. सामाजिक अंतराचा नियम योग्य रितीने पाळल्याने येथे हा रोग आता संपण्याच्या मार्गावर आहे. सिंगापूरचा आदर्श जगाने आपल्यासमोर ठेवावा, असे आवाहन जगातील अनेक आरोग्य तज्ञांकडून करण्यात आले आहे.
पुन्हा रूग्णवाढ
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे नवे 2 हजार 684 रूग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडय़ात नव्या रूग्णांच्या ंसंख्येत घट दिसून आली. त्यामुळे निर्बंध काही प्रमाणात आणखी शिथील करण्यात आले. पण आता पुन्हा रूग्णंख्या वाढल्याने नव्याने ते लागू करण्यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे. या देशात दोन दिवसांपूर्वी 57 रूग्णांचा मृत्यू झाला होता. येथे आतापर्यंत 36 लाख चाचण्या घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.