डेव्हिड वॉर्नरची शंभरावी कसोटी, स्कॉट बोलँडचे स्थान कायम
वृत्तसंस्था/ मेलबर्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली असून या सामन्यातही वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड स्नायुदुखापतीतून पूर्ण बरा झालेला नसल्याने संघाबाहेर राहणार आहे.
आज 26 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या या कसोटीत मागील वर्षीच्या ऍशेसमधील हिरो स्कॉट बोलँडने अंतिम संघातील स्थान राखले आहे. हा स्थानिक खेळाडू आपला जबरदस्त फॉर्म या सामन्यातही कायम राखेल, अशी आशा केली जात आहे. अनुभवी जोश हॅझलवूडऐवजी बोलँडला पसंती देण्याचे कारण कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत सांगितले. ‘आम्ही हॅझलवूडला पुरेशी संधी दिली आहे. पण त्याच्याकडून आता अपेक्षित कामगिरी होत नाहीय, असे सर्वांनाच वाटत आहे. त्याने स्वतःच आपण अपेक्षित कामगिरी करू शकणार नसल्याचे मान्य केले असून निवडीपासून त्याने स्वतःला अलग केले आहे. संघाची मानसिकता सकारात्मक असण्याबाबत आम्ही नेहमीच बोलतो, त्याचेच हे आणखी एक उदाहरण आहे,’ असे कमिन्सने सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही 100 वी कसोटी आहे. त्याच्यासोबत सलामीला उस्मान ख्वाजा खेळेल. त्यानंतर मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड यांचा क्रम असेल. पहिल्या कसोटीत हेड सामनावीराचा मानकरी ठरला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी विविध संघांत चुरस वाढली असल्याने सध्या या चॅम्पियनशिपमध्ये आघाडीवर असणारा ऑस्ट्रेलिया संघ आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल तर पहिल्या कसोटीतील पराभव मागे सारत मुसंडी मारण्याचा प्रयत्न डीन एल्गारचा संघ करेल. ऑस्ट्रेलियाने या उन्हाळय़ात मायदेशात कसोटीमध्ये अपराजित राहण्याची परंपरा राखली असून ब्रिस्बेनमधील पहिली कसोटी त्यांनी डावाने जिंकली. या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी वाढविली तर भारताने बांगलादेशवर विजय मिळवित दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून दुसरे स्थान मिळविले आहे. द.आफ्रिका आता तिसऱया स्थानावर घसरले आहे.
दुसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ ः डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, स्मिथ, ट्रव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नाथन लियॉन, स्कॉट बोलँड.
सामन्याची वेळ ः पहाटे 5 पासून
थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क