मेहमुदुल हसन जॉयचे शतक, बांगलादेश प. डाव 298
वृत्तसंस्था/ दरबान
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी यजमान दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावात 5 बाद 154 धावा जमवित बांगलादेशवर 223 धावांची आघाडी मिळविली. बांगलादेशच्या पहिल्या डावात सलामीच्या मेहमुदुल हसन जॉयने शानदार शतक (137) झळकविले.
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 367 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 115.5 षटकांत सर्वबाद 298 धावा केल्या. सलामीचा फलंदाज मेहमुदुल हसन जॉयने 326 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 137 धावा झळकविल्या. नजमुल हुसेनने 2 षटकार आणि दोन चौकारांसह 38 धावा जमविल्या. लिटॉन दासने सहा चौकारांसह 41, यासीर अलीने 2 चौकारांसह 22, मेहदी हसन मिराजने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मेरने 103 धावांत 4 तर विलीयम्सने 54 धावांत 3 तसेच ऑलिव्हर आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात बांगलादेशवर 69 धावांची आघाडी मिळविली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावात 59 षटकांत 5 बाद 154 धावा जमवित बांगलादेशवर 223 धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात कर्णधार एल्गारने 7 चौकारांसह 64, के.पीटरसनने 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. रिकेल्टन 17 तर मुल्डेर 4 धावांवर खेळत होते. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराज आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी 2 तर तस्किन अहमदने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव 121 षटकांत सर्वबाद 367, बांगलादेश प. डाव 115.5 षटकांत सर्वबाद 298 (मेहमुदुल हसन जॉय 137, नजमुल हुसेन 38, दास 41, यासीर अली 22, मेहदी हसन मिराज 29, हार्मेर 4-103, विलीयम्स 3-54, ऑलिव्हर 1-36, मुल्डेर 1-23), दक्षिण आफ्रिका दु. डाव 59 षटकांत 5 बाद 154 (एल्गार 64, पीटरसन 36, रिकेल्टन खेळत आहे 17, मेहदी हसन मिराज 2-58, इ हुसेन 2-35, टी. अहमद 1-11).