दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडवर विजय, मेरिझेन कॅप “: सामन्यात सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई (न्यूझीलंड)
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मेरिझेन कॅपच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा तीन गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात कॅपने 45 धावांत 5 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 235 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 236 धावा जमवित विजय नोंदविला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाज शबनीम इस्माईल केवळ 5 षटकांची गोलंदाजी केल्यानंतर दुखापतीमुळे तंबूत परतली पण कॅपने दर्जेदार गोलंदाजी करत इस्माईलची उणीव भासू दिली नाही. इंग्लंडच्या डावामध्ये बेमाँटने 62 तर ऍमी जोन्सने 53 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे केपने 45 धावांत 5 गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पाचव्या षटकांत त्यांची सलामीची फलंदाज ली बाद झाली. संघाची स्थिती यावेळी 1 बाद 18 अशी होती. त्यानंतर वुलव्हार्ट आणि ब्रिटस् या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 56 धावांची भागिदारी केली. कर्णधार रूटने 36 धावा जमविल्या. वुलव्हार्टने 77 धावा झळकविल्या. डावातील 35 व्या षटकांत इंग्लंडच्या क्रॉसने वुलव्हार्टला बाद केले. त्यानंतर इक्लेस्टोनने दक्षिण आफ्रिकेच्या डु प्रीजला 8 धावांवर बाद केले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या पाच षटकांत विजयासाठी 31 धावांची जरूरी होती आणि त्यांचे चार गडी खेळावयाचे होते. कॅपने 32 धावांचे योगदान दिले. त्यानंतर चेटी आणि शबनिम इस्माईल या जोडीने डावातील शेवटच्या षटकांत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 235 (ब्युमाँट 62, जोन्स 53, कॅप 5-45), दक्षिण आफ्रिका 49.2 षटकांत 7 बाद 236 (वुलव्हार्ट 77, लुस 36, श्रबसोल 2-34).