केशव महाराजचे सात बळी, बांगलादेशचा दुसऱया डावात 53 धावांत धुव्वा
वृत्तसंस्था/ दरबान
केशव महाराजच्या जादुमय फिरकीच्या जोरावर सोमवारी येथे यजमान दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या शेवटच्या दिवशी पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 220 धावांनी दणदणीत पराभव केला. बांगलादेशच्या दुसऱया डावात केशव महाराजने 32 धावांत 7 गडी बाद केले. बांगलादेशचा दुसरा डाव केवळ 19 षटकांत 53 धावांत आटोपला.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी मिळविली असून आता दुसरी आणि शेवटची कसोटी येत्या गुरूवारपासून पोर्ट एलिझाबेथ येथे खेळविली जाणार आहे. दर्बानच्या किंग्जमेड मैदानावर कसोटीत बांगलादेशची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. 1996 साली याच मैदानावर भारताचा डाव 66 धावांत आटोपला होता.
या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 367 धावा जमविल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 298 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात बांगलादेशवर 69 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 74 षटकांत सर्वबाद 204 धावा जमवित बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले. आफ्रिकेच्या दुसऱया डावात कर्णधार एल्गारने 7 चौकारांसह 64, के.पीटरसनने 4 चौकारांसह 36, रिकेल्टनने 4 चौकारांसह 39, मुल्डेरने 11 तर हार्मेरने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराज आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी 3 तर तस्किन अहमदने 2 गडी बाद केले.
डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि हार्मेर यांच्या फिरकी माऱयासमोर बांगलादेशचा दुसरा डाव केवळ 55 मिनिटात 19 षटकांत 53 धावांत आटोपला. बांगलादेशने 3 बाद 11 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे सात गडी 42 धावांत तंबूत परतले. केशव महाराजने 32 धावांत 7 तर हार्मेरने 21 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात केशव महाराज आणि हार्मेर यांनी एकूण 14 बळी मिळविले.
शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच षटकांत केशव महाराजने रहीमला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. त्यानंतर त्याने लिटॉन दासला दोन धावांवर मिडऑनवरील हार्मेरकडे झेल देण्यास भार पाडले. केशव महाराजने यासीर अलीचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. हार्मेरने मेहदी हासन मिराजला शून्यावर झेलबाद केले. बांगलादेशच्या डावामध्ये नजमुल हुसेनने 52 चेंडूत 1 षटकार आणि एक चौकारांसह सर्वाधिक 26 धावा जमविल्या. हार्मेरने त्याला यष्टीरक्षक व्हेरेनीकरवी यष्टीचीत केले. केशव महाराजने खलीद मेहमुदला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. त्यानंतर केशव महाराजने तस्किन अहमदला 14 धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव 53 धांवावर संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव-सर्वबाद 367, बांगलादेश प. डाव सर्वबाद 298, दक्षिण आफ्रिका दु. डाव-74 षटकांत सर्वबाद 204 (एल्गार 64, रिकेल्टन नाबाद 39, के.पीटरसन 36, मुल्डेर 11, हार्मेर 11), बांगलादेश दु. डाव- 19 षटकांत सर्वबाद 53 (नजमुल हुसेन 26, तस्किन अहमद 14, केशव महाराज 7-32, हार्मेर 3-21).