डेव्हिड मिलरचे शेवटच्या षटकात 2 षटकार, वणिंदू हसरंगाची हॅट्ट्रिक निष्फळ
शारजाह / वृत्तसंस्था
शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरने लहिरु कुमाराला खेचलेल्या 2 उत्तुंग षटकारांमुळे दक्षिण आप्रेकेने आयसीसी टी-20 विश्वचषक सुपर-12 लढतीत श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. वणिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक केली असली तरी तो लंकेला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात लंकेने 20 षटकात सर्वबाद 142 धावा केल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19.5 षटकात 6 बाद 146 धावा जमवत विजय मिळवला.
डेव्हिड मिलरने अवघ्या 13 चेंडूत नाबाद 23 धावांची खेळी साकारली आणि इथेच दक्षिण आफ्रिकेचा विजय सुनिश्चित झाला. शेवटच्या 2 षटकात विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असताना मिलरने फटकेबाजी केली. शेवटच्या 6 चेंडूत 15 धावा असे समीकरण असताना लहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर रबाडाने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. त्यानंतर मिलरने सलग दोन षटकार खेचले. उर्वरित 3 चेंडूत 2 धावा, असे समीकरण असताना मिलरने एकेरी धाव घेतली. त्यानंतर रबाडाने थर्डमॅनच्या दिशेने चौकार फटकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने एका चेंडूचा खेळ बाकी राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.
प्रारंभी, डावखुरा फिरकीपटू तबरेझ शमसी (3-17) व प्रिटोरियस (3-17) यांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लंकन फलंदाजीला खिंडार पाडले आणि यामुळे या संघाला 20 षटकात सर्वबाद 142 धावांवर समाधान मानावे लागले होते. सलामीवीर पथूम निसांकाने 72 धावांची खेळी साकारल्यानंतरही लंकेचे मोठी धावसंख्या रचण्याचे मनसुबे धुळीस मिळाले होते.
विजयासाठी 143 धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. पण, बवूमाने 46 धावा जमवत आव्हान कायम राखले. बवूमा व मॅरक्रम (19) यांनी 47 धावांची साकारलेली भागीदारी महत्त्वाची ठरली. हसरंगाने 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅरक्रमचा त्रिफळा उडवला. नंतर 18 व्या षटकात तेम्बा बवूमा व प्रिटोरियस यांना पहिल्या दोन चेंडूंवर बाद करत त्याने हॅट्ट्रिक साजरी केली. मात्र, ही कामगिरी लंकेला विजय मिळवून देऊ शकली नाही.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका ः 20 षटकात सर्वबाद 142 (पथूम निसांका 58 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 72, चरिथ असलंका 14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 21, दसून शनाका 12 चेंडूत 11. अवांतर 9. तबरेझ शमसी 4 षटकात 3-17, डेव्हॉन प्रिटोरियस 3 षटकात 17 धावात 3 बळी, ऍनरिच नोर्त्झे 2-27).
दक्षिण आफ्रिका ः 19.5 षटकात 6 बाद 146 (तेम्बा बवूमा 46 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 46, डेव्हिड मिलर 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 23, रबाडा 7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 13. अवांतर 6. वणिंदू हसरंगा 4 षटकात 3-20, दुष्मंता चमीरा 4 षटकात 2-27).