वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
शुक्रवारी येथील पहिल्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आप्रेकेने पाकविरुद्ध 50 षटकात 6 बाद 273 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या व्हान डर डय़ुसेनने नाबाद शतक (123) झळकविले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पाकने 1 बाद 22 धावा जमविल्या होत्या.
या पहिल्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 6 गडय़ांच्या मोबदल्यात 273 धावापर्यंत मजल मारली. पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला 14.2 षटकात 4 बाद 55 अशी केविलवाणी स्थिती होती. पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सलामीचा फलंदाज डि कॉकला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 20 धावा जमविल्या. शाहीन आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना मार्करमला बाद केले. त्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 19 धावा जमविल्या. पाकच्या मोहम्मद हसनेनने कर्णधार बेहुमाला केवळ एका धावेवर झेलबाद केले. फईम अश्रफने क्लासेनला एका धावेवर बाद करून दक्षिण आफ्रिकेवर अधिकच दडपण आणले.
डय़ुसेन आणि मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी केली. मिलरने 56 चेंडूत 5 चौकारासह 50 धावा जमविल्या. हॅरीस रौफने मिलरला झेलबाद केले. रौफच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा फेहलुक्वायो झेलबाद झाला. त्याने 35 चेंडूत 4 चौकारासह 29 धावा जमवल्या. व्हान डर डय़ुसेनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत 134 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारासह नाबाद 123 धावा जमविल्या. रबाडा 2 चौकारासह 13 धावावर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी 2 तर हसनेन आणि अश्रफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील तिसऱया षटकातच रबाडाने सलामीच्या फख्र झमानचा 8 धावावर त्रिफळा उडविला. पाकने 8.3 षटकाअखेर 1 बाद 22 धावापर्यंत मजल मारली होती. इमाम उल हक 9 तर कर्णधार बाबर आझम 4 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका 50 षटकात 6 बाद 273 (व्हान डर डय़ुसेन नाबाद 123, मिलर 50, मार्करम 19, डि कॉक 20, बेहुमा 1, हेन्रिच क्लासेन 1, फेहलुक्वायो 29, रबाडा नाबाद 13, शाहीन आफ्रिदी 2-61, रौफ 2-72, हसनेन 1-52, अश्रफ 1-25).