उत्तर कोरियाच्या सैनिकांचे कृत्यः अधिकाऱयाचा मृतदेह जाळला
वृत्तसंस्था/ सोल
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या एका बेपत्ता मत्स्य अधिकाऱयाची गोळय़ा घालून हत्या करत त्याचा मृतदेह जाळला आहे. दक्षिण कोरियाने या घटनेला अपमानास्पद ठरविले आहे. आमचे सैन्य या क्रूरतेची निर्भत्सना करते आणि उत्तर कोरियाकडून स्पष्टीकरण आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
वादग्रस्त सागरी सीमेनजीक उत्तर कोरियाच्या सैनिकांनी मत्स्य अधिकाऱयावर गोळय़ा झाडल्या आहेत. 47 वर्षीय हा अधिकारी शासकीय नौकेतून पाहणी करत होता. याचदरम्यान उत्तर कोरियाच्या सैनिकांनी गोळीबार केल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. हत्येनंतर मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे गुप्तचरांकडून कळाल्याचेही म्हटले गेले.
हा अधिकारी उत्तर कोरियात जाऊ पाहत होता अशी माहितीही मिळाली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाच्या प्रशासनाने कठोर धोरण अवलंबिले आहे. यानुसार अवैध मार्गाने सीमा ओलांडणाऱयावर दिसताक्षणी गोळय़ा झाडण्याचा आदेश आहे. याच कारणामुळे उत्तर कोरियाच्या सैनिकांनी या अधिकाऱयावर गोळय़ा झाडल्या असण्याचीही शक्यता आहे. या घटनेसाठी पूर्णपणे उत्तर कोरिया जबाबदार असून त्याला याचे स्पष्टीकरण द्यावेच लागणार असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला बेपत्ता अधिकाऱयाचा शोध लावण्यासाठी बुधवारी संदेश पाठविला होता.