वृत्तसंस्था/ कॅनबरा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात एका मोठय़ा संरक्षण करारावरून सहमती झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान सुमारे 71.70 कोटी डॉलर्सचे संरक्षण करार झाले आहेत. दक्षिण कोरियातील शस्त्रास्त्रनिर्मिती कंपनी हनवाने ऑस्ट्रेलियाच्या सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रs, सैन्य वाहने आणि रडार्सच पुरवठा करण्यासंबंधी करार केला आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांच्या 4 दिवसीय ऑस्ट्रेलिया दौऱयादरम्यान या संरक्षण करारांवर स्वाक्षरी झाली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारे मून हे पहिले विदेशी नेते ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियावर अधिक विश्वास
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी या दौऱयातून ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याची इच्छा दर्शविली आहे. चीनसोबत देशाच्या व्यापार संबंधांचे महत्त्व असूनही दक्षिण कोरिया सुरक्षेप्रकरणी ऑस्ट्रेलिया सारख्या अमेरिकेच्या सहकारी देशांवर अधिक विश्वास ठेवत असल्याचे यातून दिसून येते.
अनेक दशके जुने संबंध
चीन आणि दक्षिण कोरिया पुढील वर्षी 30 वर्षांच्या राजनयिक संबंधांचा जल्लोष करणार आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाचे राजनयिक संबंध 60 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहेत. दोन्ही देशांदरम्यान जुने सैन्य संबंध देखील आहेत. कोरियन युद्धावेळी दक्षिण कोरियाच्या सैन्यासोबत सुमारे 18 हजार ऑस्ट्रेलियन सैनिकांनी लढा दिला होता. 2014 मध्ये लागू झालेल्या मुक्त व्यापार करारुमळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिकच बळकट झाले आहेत.