वृत्तसंस्था/ सेऊल
दक्षिण कोरियातील लिग फुटबॉल हंगामाला 8 मे पासून प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा दक्षिण कोरियाच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली. दरम्यान, दक्षिण कोरियातील के-लिग फुटबॉल स्पर्धेसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असून या नव्या नियमांची माहिती करून घेण्याकरिता दक्षिण कोरियातील फुटबॉलपटू, प्रशिक्षक यांना दोन आठवडय़ांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दक्षिण कोरियातील के-लिग फुटबॉल स्पर्धेतील सलामीचा सामना 8 मे रोजी जॉनबुक मोटर्स आणि सुवोन ब्ल्यूवेंग्ज यांच्यात होणार आहे. सदर स्पर्धा 29 फेब्रुवारीपासून खेळविली जाणार होती. पण कोरोना व्हायरस महामारीमुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय दक्षिण कोरियाच्या फुटबॉल फेडरेशनने घेतला होता. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत 240 जणांचा कोरोना व्हायरसमध्ये मृत्यू झाला असून सुमारे 11 हजार लोकांना कोव्हिड-19 ची बाधा झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे दक्षिण कोरियामध्ये कोरोना महामारीविरुद्ध कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी होत असल्याने या नियमांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरच्या वापराची सक्ती करण्यात आली आहे.