अमित शाह असणार अध्यक्षस्थानी
वृत्तसंस्था / तिरुपती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 14 नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशच्या तिरुपतीमध्ये होणाऱया दक्षिण क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्षत्व करू शकतात. अधिकाऱयांनी यासंबंधी माहिती दिली आहे. गृहमंत्री शाह दक्षिणेतील राज्यांच्या महनीय व्यक्तींच्या बहुप्रतीक्षित संमेलनाचे अध्यक्ष असणार असून यात कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे मुख्यमंत्रीही सामील होणार आहेत.
या बैठकीत अंदमान आणि निकोबार, पुदुच्चेरीच्या केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांसोबत पुदुच्चेरीचे प्रशासकही सामील होणार आहेत. तिरुपतीच्या हॉटेल ताजमध्ये होणाऱया दिवसभराच्या बैठकीत काही वरिष्ठ कॅबिनेट मंत्रीही भाग घेऊ शकतात.
दक्षिण क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत विशेष शेणीच्या दर्जाचा (एससीएस) मुद्दा उपस्थित करण्याचा विचार आंध्रप्रदेशने चालविला आहे. एससीस मुद्दय़ांसह केंद्र तसेच शेजारी राज्यांकडून प्रलंबित देयकाशी संबंधित मुद्देही उपस्थित केले जाणार आहेत.
तेलंगणात कृष्णा नदीवरील जुराला प्रकल्प कृष्णा नदी व्यवस्थापन मंडळाच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा उपस्थित करण्यासह नद्यांना जोडण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचाही निर्णय आंध्रप्रदेशकडून घेण्यात आला आहे. राज्यांमध्ये उत्तम समन्वय आणि प्रलंबित आंतरराज्य मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी क्षेत्रीय परिषदेच्या बैठका आयोजित करण्यात येतात.