प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘लिफ्ट’ बेभरवाशाची बनली आहे. काल मंगळवारी पुन्हा एकदा लिफ्ट बंद पडल्याने सुमारे 20 मिनिटे लोक आतमध्ये अडकून पडले. नंतर अग्नीशामक दलाला पाचारण करून त्याची सुटका करण्याची पाळी आली आहे. या पूर्वी देखील अशाच प्रकारे लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेले होते.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट मध्येच बंद पडण्याचा प्रकार काल मंगळवारी घडला. सुमारे 20 मिनिटे लिफ्ट मध्येच बंद पडून राहिली. नंतर या घटणेची कल्पना अग्नीशामक दलाला देण्यात आल्यानंतर त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांची सूटका केली. या पूर्वी देखील असेच प्रकार घडले होते. मात्र, त्यातून कोणताच बोध जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतल्याचे स्पष्ट झाले. वीज पुरवठा खंडित झाला तरी त्याला पर्यायी वीज पुरवठा करून लिफ्ट चालू ठेवणे शक्य असते. मात्र, अद्याप तशी सुविधा करण्यात आलेली नाही हे कालच्या घटणेनंतर स्पष्ट झाले.
लिफ्ट अचानक मध्येच बंद पडल्यानंतर लोकांचा गोंधळ उडत असतो. मग मदतीसाठी आरडाओरडा केला जातो. याच गोंधळात जर एखादी हृदय विकाराचा आजार असलेली व्यक्ती असेल तर तिच्यावर कोणती परिस्थिती उद्भवणार याचा कोणी तरी विचार केला आहे असा संतप्त सवाल काल लिफ्ट मध्ये अडकलेल्या लोकांनी उपस्थितीत केला. लिफ्ट बंद पडली तरी त्यात अडकलेल्या लोकांची सूटका करण्याची सुविधा असते. मात्र, त्यासाठी चावीची गरज भासते. ही चावी कुठे आहे याची देखील माहिती येथील सुरक्षा कर्मचाऱयांना नसल्याचा आरोप यावेळी लोकांनी केला.
दुर्घटना घडण्यापूर्वी उपाय योजना आखा
दरम्यान, लिफ्ट मध्ये लोक अडकून पडणे ही अत्यंत धोक्याची बाब आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकार यावर उपाय योजना आखली पाहिजे अशी प्रतिक्रीया मडगावचे ज्येष्ठ वकील राधाराव ग्रासीयस यांनी व्यक्त केली. बऱयाच इमारतींनी असे प्रकार घडतात. त्यासाठी सरकारने लिफ्ट संदर्भात सरकारने एक कायदाच करावा अशी मागणी ही त्यांनी केली.
वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात म्हणून लिफ्ट अर्ध्यावर बंद पडू नये यासाठी इमारतीच्या मालकांनी किंवा बिल्डरांनी उपाय योजना आखणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात लिफ्टमध्ये लोक अडकून पडतात व प्रशासन काहीच दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.