प्रतिनिधी/ मडगाव
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी मडगाव येथील ईएसआय, हॉस्पिसियो व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची पाहणी केली. सकाळी 10 वा. ईएसआय इस्पितळाला भेट देऊन त्यांनी कोरोनासंदर्भात चांगली कामगिरी केलेले डॉ. एडविन गोम्स व त्यांच्या इतर सहकाऱयांचे अभिनंदन केले. नंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची पाहणी करून झाल्यानंतर सोमवारपासून या इस्पितळाची ओपीडी सुरू केली जाणार असल्याची माहिती राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
केंद्र सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील ओपीडी सुरू केली जाईल, असे राणे यांनी सांगितले. इस्पितळाचे सर्व काम पूर्ण झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात जरी आता कोरोनाचा एकही रुग्ण नसला, तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे टाळण्याचीही गरज आहे. ग्रामीण भागांतील लोकांनी लॉकडाऊनचे योग्य पद्धतीने पालन केले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोनापासून इतक्या लवकर मुक्तता मिळणार नाही असे दिसून येत आहे. गोव्यातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रयत्न चालू आहे. जर पुन्हा गोव्यात कोरोनाचे रुग्ण आढळले, तर कशा पद्धतीने उपाययोजना करायची यासाठी आमची तयारी चालू आहे. आरोग्य खात्यातील सर्व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्या सर्वांचे आपण अभिनंदन केले पाहिजे, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
तसेच कोरोनासंदर्भात परिचारिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आमचे प्रयत्न असतील. खासगी इस्पितळांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास कोणताही पुढाकार न घेतल्याने याची संपूर्ण जबाबदारी सरकारी इस्पितळांतील कर्मचाऱयांना घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितले. 30 मेपर्यंत देशात एक लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.