जुना पी. बी. रोड खासबाग येथील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी सायंकाळी क्षुल्लक कारणावरून दोन गटात दगडफेक झाली आहे. जुना पी. बी. रोड खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडफेकीत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अरजान बेपारी (वय 19, रा. होसूर) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
रात्री मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दगडफेकीचे निश्चित कारण जाणून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. जखमी तरुणावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे उपस्थितांतून सांगण्यात आले.