स्टोन आर्टची किमयागार ऋतिका पालकर; नदीनाल्यातील दगडांना केले बोलते
तेजस देसाई / दोडामार्ग:
मुळात निसर्ग हाच मोठा कारागीर आहे. त्याने निसर्गातील प्रत्येक वस्तू सुबकतेने आखीव-रेखीव बनवलेली आहे. माणसाने फक्त त्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाकडे पाहिले पाहिजे. नेमक्या याच दृष्टिकोनातून ऋतिका दगडांकडे पाहत आहे. एखादा शिल्पकार ओबडधोबड दगडांमधील नको असलेला भाग हातोडी- छिन्नीने काढून टाकून त्याला हवी तशी मूर्ती घडवितो. त्यानंतर दगडाला देवत्व प्राप्त होते. मात्र, ऋतिकाने निसर्गातील ओबडधोबड दगड आहेत तसेच वापरून त्यांची विशिष्ट कलात्मक पद्धतीने रचना करून कलाकृती घडविल्या आहेत. दगडांना निसर्गाने दिलेला नैसर्गिक रंग व आकार अबाधित ठेवून तिने दगडांमध्ये देवपण आणले आहे. शिवाय तिच्या या कलाकृतींमुळे कोकणातील दगड बोलू लागले आहेत. या दगडांच्या कलाकृती अर्थात स्टोन आर्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी मिळत आहे. ही किमया करून दाखवली आहे माणगाव (कुडाळ) येथील ऋतिका विजय पालकर हिने.
ऋतिका पालकर हिचे शिक्षण बीएस्सी आयटीपर्यंत झाले. वेब डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंगची तिला आवड आहे. वडील काष्ठ शिल्पकार असल्याने लहानपणापासून प्रत्येक गोष्टीकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची सवय जडली. झाडाबुंध्यात, खोडात, मुळात नैसर्गिक आकारात कलात्मक सौंदर्य दडलेले आहे. ते शोधून त्याची कलात्मक माडणी केली की, ओळखीचे आकार तयार होतात. त्यात गणपती असेल मोर असेल किंवा आणखी काही, हे मी वडिलांच्या छंदात पाहत होते. त्यामुळे नदीकाठी फिरताना छोटय़ा-छोटय़ा दगडातही खूप काही नैसर्गिक आकार दडलेले आहेत. दोन किंवा तीन दगडांना एकत्र केले तर खूप छान ओळखीचा आकार तयार होतो. तसा प्रयत्न केल्यावर हळूहळू खूपच थीम तयार होऊ लागल्या. कधी विठ्ठल, कधी गणेश तर कधी कृष्ण, मेंढपाळ, तर कधी मासेवाली बाई, धनेश पक्षी, बगळा अशा विविध कलाकृती तयार झाल्या. सुरुवातीला डोक्यात थीम घेऊन दगड शोधावे लागत होते. आता एखादा दगड दिसला तरी थीम सूचते, असे ऋतिका सांगते.
कलाकृती युनिक
नैसर्गिक दगडांच्या मूळ आकारांना कुठलीही बाधा न येता त्यांच्या नैसर्गिक आकारातच एखादी थीम तयार केली जाते. त्यामुळे प्रत्येक कलाकृती युनिक असते. दगडांची थीम प्रेममध्ये बंदिस्त केली जाते. त्यामुळे ती थीम भिंतीवर सहजपणे लटकवू शकतो. बऱयाच कलाकृती या ग्रामीण महिला व संस्कृतीवर आधारित आहेत. या कलेतून कोकणातील ग्रामीण जीवन उलगडून दाखविण्याचा मानस आहे.
ऋतिकाची आजवरची स्टोन आर्ट प्रदर्शने
ऋतिका हिने 9-15 नोव्हेंबर 2018 दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट ऍन्ड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन, 3-6 जानेवारी 2019 मुंबई गोरेगाव येथे ग्लोबल कोकण महोत्सव 2019 मध्ये सहभाग घेतला. 27-28 मार्च 2019 ला टाटा इन्स्टिटय़ुट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर, कुलाबा-मुंबई येथे प्रदर्शनासाठी तिला आमंत्रित करण्यात आले. 21-27 एप्रिल 2019 या कालावधीत वैयक्तिक पातळीवर कोल्हापूर जिह्यातील नामांकित आर्ट गॅलरी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन, 26-29 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ताज महाल पॅलेस, मुंबई येथे प्रदर्शन, 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे प्रदर्शन, 11-16 फेब्रुवारी 2020 रोजी पीएनजी ऍन्ड सन्स कोथरुड-पुणे येथे प्रदर्शन भरविण्यात आले.
ऋतिका म्हणते…
लाकडामध्ये जसे आकार असतात, तसेच दगडांमध्ये नैसर्गिक आकार असतात. त्याची कलात्मक मांडणी करून एकादी थीम प्रेममधे बंदिस्त केली तर त्या कलाकृतींची विक्री होऊ शकते, हे वडील काष्ठशिल्प तयार करतानाच सूचलं. म्हणून एक कपलची थीम करून प्रेम तयार केली. ती एका डॉक्टरनी विकत घेतली. हळूहळू अनेक थीम तयार झाल्या. दिल्लीतील प्रदर्शनात अनेक मान्यवर मंडळींनी कलाकृती विकत घेतल्या. त्यामुळे प्रदर्शनात भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. आतापर्यंत सात प्रदर्शने झाली. प्रत्येक प्रदर्शनात सर्वच कलाकृती युनिक असल्यामुळे कुतुहलाने पाहात होते. आणि त्यांची विक्री होत होती. ही गोष्ट प्रोत्साहन देणारी ठरली. प्रत्येक कलाकृती युनिक असल्यामुळे माझी आवडती कलाकृती आहे. समुद्र किनारच्या व नदीकाठावरील झाडांपासून कलाकृती तयार केल्या आहेत, असे ऋतिका सांगते.