मृतदेहाप्रमाणे शवपेटीत पहुडला युवक
विवाहापूर्वी जोडपे सध्या प्री-वेडिंग फोटोशूट करवितात, ज्यात सुंदर स्थळ आणि आकर्षक थीमचा वापर केला जातो. परंतु एका जोडप्याने स्वतःचे अजब प्री-वेडिंग शूट करविले असून ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. जोडप्याच्या फोटोशूटची थीम ‘अंत्यसंस्कार’ होती, ज्यात पोझ देण्यासाठी ते शवपेटीत पहुडताना दिसून आले. 32 वर्षीय थाई ग्राफिक्स डिझाइनर नॉन्स कोंगचॉ आणि त्यांच्या प्रेयसीची छायाचित्रे हजारोवेळा शेअर करण्यात आली आहेत.
छायाचित्रांमध्ये नॉन्स यांना स्वतःच्या प्रेयसीसोबत एका दफनभूमीत सिल्वर सूट परिधान करून विविध प्रकारच्या पोझ देताना पाहिले जाऊ शकते. त्यांच्या प्रेयसीने एक पांढऱया रंगाचा वेडिंग गाउन परिधान केला होता. एका छायाचित्रात हे जोडपे एका कब्रजवळ दिसून येत असून त्याच्या स्तंभावर ‘मॅरी मी’ असे लिहिलेले आहे. सर्वात भयानक पोझमध्ये नॉन्स एका शवपेटीत झोपल्याचे तर महिला सिल्क कव्हर बंद करताना आणि तिच्या हातात एक पुष्पगुच्छ दिसून येतो.
लोकांकडून टीका
ही छायाचित्रे भीतीदायक तसेच लोकांना विचित्र वाटणारी आहेत. युजर्सनी या छायाचित्रांवर जोरदार टीका केली आहे. अशाप्रकारे अदृश्य गोष्टींशी खेळ करणे चुकीचे असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. तर दुसऱया युजरने ‘सावध रहा, अशाप्रकारच्या गोष्टींमध्ये रहस्य लपलेले असते’ असे सूचनावजा विधान केले आहे.
मृत्यूनंतर अंत्यसंस्काराशी निगडित प्रत्येक गोष्टी चमत्कारिक असते असे एका युजरने म्हटले आहे. तर काही लोकांनी जोडप्याच्या या अनोख्या फोटोशूटचे कौतुक देखील केले आहे. एका युजरने जोडप्याच्या अजब थीमचे कौतुक करत हे खरोखरच भीतीदायक होते असे म्हटले आहे. तर हे जोडपे खरोखरच विवाह करणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.