नवीन कुमार, पवन सेहरावत, मनिंदर सिंगचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात दबंग दिल्लीने यू मुम्बाचा, बेंगळूर बुल्सने तामिळ थलैवाजचा, बंगाल वॉरियर्सने गुजरात लायन्सचा पराभव केला.
दिल्ली दबंगने यू मुम्बावर 31-27 अशी मात केली. त्यांचा रायडर नवीन कुमार त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एकूण 17 गुण मिळविले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात यू मुम्बाने बराच वेळ आघाडी घेतली होती. नवीन कुमारसह रायडर्सनी सावध सुरुवात केली. दोन्ही संघांच्या डिफेंडर्सनी अचूक बचाव करीत एकही बोनस गुण प्रतिस्पर्ध्याला मिळणार नाही, याची दक्षता घेतली. मुंबईचे रायडर अभिषेक सिंग व अजित कुमार यांना दैवाची साथही मिळाली नाही. पहिल्या दहा मिनिटानंतर दोन्ही संघांत 5-5 अशी बरोबरी झाली होती. मध्यंतर जवळ आल्यानंतर दिल्लीने डावपेचात बदल केला. कुमारने त्यात महत्त्वाची भूमिका बजावत मुंबईचा फक्त एक खेळाडू बाकी ठेवला होता. अनिल शिवमने एक रेडपॉईंट मिळविला आणि एक सुपर टॅकल करीत मुंबईचे आव्हान जिवंत ठेवले. मध्यंतरापर्यंत एकही संघ ऑलआऊट झाला नाही. मध्यंतराला मुंबईने 12-10 अशी आघाडी मिळविली होती.
उत्तरार्धात अभिषेक सिंग व अनिल यांनी मुंबईला जलद सुरुवात करून देताना दिल्लीला ऑलआऊट केले आणि 19-10 अशी आघाडी घेतली. पण कुमारने अनेकदा यशस्वी रेड टाकत दहाव्या मिनिटाला मुंबईला ऑलआऊट केले आणि स्कोअर 20-20 असा बरोबरीत आणला. सामना संपण्यास 7 मिनिटे असताना कुमारने सुपर 10 मिळविले आणि नंतर 3 गुणांचा सुपर रेड टाकत मुंबईच्या हातातून सामना हिसकावून घेतला. वरिष्ठ खेळाडू मनजीत चिल्लर व जीवा कुमार यांनी बचावात काही चुका केल्या. पण दिल्लीने आघाडी टिकवून ठेवत महत्त्वाचा विजय साकार केला.
बुल्सच्या विजयात पवनची चमक
दिवसातील दुसऱया सामन्यात पवन सेहरावतचे 9 रेडपॉईंट आणि बचावफळीने मिळविलेले 14 गुण यांच्या बळावर बेंगळूर बुल्सने तामिळ थलैवाजचा 38-30 अशा गुणांनी पराभव केला. त्यांच्या सौरभ नंदनने बचावात उत्तम कामगिरी करीत 5 टॅकल गुण मिळविले. पहिल्या दहा मिनिटांत दोन्ही संघांनी भक्कम बचाव केल्याने दोघांनाही फारसे रेडपॉईंट मिळाले नसल्याने 7-7 अशी बरोबरी झाली होती. भरत व नंतर सेहरावत यांनी काही रेडपॉईंट मिळवित थलैवाजचा एकच खेळाडू मैदानात बाकी राहिला. लवकरच ऑलआऊट करीत बुल्सने 17-11 अशी बढत घेतली. मध्यंतराला थलैवाजने बुल्सची आघाडी 13-19 अशी कमी केली होती. उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटात दोन्ही संघांनी गुण मिळविण्याचा धडाका सुरू केला. थलैवाजने 6 गुण घेत बुल्सला ऑलआऊट करून 22-19 अशी बढत मिळविली. बुल्सनेही सहा गुण घेत तीन गुणांची आघाडी घेतली. सागरचे सुपर टॅकल आणि मनजीतने मिळविलेल्या रेइपॉईंटनंतर 25-25 अशी दोन्ही संघांत बरोबरी झाली. भरत व चंद्रन रणजीत यांच्या खेळाने बुल्सने थलैवाजला ऑलआऊट करीत सामन्यावर नियंत्रण मिळविले. थलैवाजने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. पण बुल्सने उत्तम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही.
बंगाल वॉरियर्स विजयी
तिसऱया सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा अखेरच्या टप्प्यातील कडवा प्रतिकार मोडून 31-28 असा केवळ तीन गुणांनी विजय मिळविला. बंगालच्या मनिंदर सिंगने 9 रेडपॉईंट व रिंकू नरवालने 3 टॅकल पॉईंट मिळविले तर गुजरात जायंट्सच्या राकेश नरवालने सर्वाधिक 12 गुण मिळविले व रविंदर पहलने 3 टॅकल गुण मिळविले.
रविवारचे सामने
1) पाटणा पायरेट्स वि. यूपी योद्धा
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) पुणेरी पलटन वि. तेलुगू टायटन्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
3) जयपूर पिंक पँथर्स वि. हरियाणा स्टीलर्स
वेळ ः रात्री 9.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क