प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या दीड वर्षात भ्रष्टाचार आणि इतर कारणांनी जिल्हा परिषदेची मलिन झालेली प्रतीमा सुधारण्यासाठी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पावले उचलतील. कुणाच्याही दबावात न राहता जनहिताचे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी राहुल पाटील आणि जयवंतराव शिंपी यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, माझ्या अध्यक्षीय कार्यकाळात मला ज्या अडचणी आल्या, त्यांचा नूतन अध्यक्षांना पुन्हा सामना करावा लागू नये, यासाठी निश्चितपणे माझे त्यांना सहकार्य असेल. गेल्या दीड वर्षात भ्रष्टाचार आणि इतर काही गोष्टींमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. आता पुन्हा ती प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने नूतन अध्यक्ष पावले उचलतील आणि कोणाच्याही दबावात न राहता जनकल्याणासाठी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा आहे.
विरोधाला विरोध नाही
जनहिताचे निर्णय, विकासकामे आणि गरज भासेल तेथे विरोधाला विरोध न करता सहकार्य करू, मात्र जनहितामध्ये कुठे तडजोड होत आहे, असे निदर्शनास आल्यास, विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित आवाज उठवू, असा इशाराही देण्यास शौमिका महाडिक विसरल्या नाहीत.