मागील चार वर्षात घोडदौड कायम – एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे बाजारमूल्य मजबूत स्थितीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज व्यावसायिक राधाकृष्ण दमानी यांची कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे समभाग मंगळवारीही (ऑल टाईम) उच्चांकी पातळीवर ट्रेडिंग करत आहेत. यामध्ये कंपनीचे समभाग बीएसईवर ट्रेडिंगदरम्यान 1.96 टक्क्यांच्या वाढीने 3,425 रुपयांवर पोहोचले आहेत.
किरकोळ व्यापाराची साखळी म्हणून ओळख असणाऱया डि मार्टला ऑपरेट करणारी ही कंपनी आहे. या कंपनीच्या समभागाचा भाव मंगळवारच्या सत्रात दुपारी 2 पर्यंत 3,382.35 रुपयावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
एव्हेन्यू सुपरमार्ट्स 2.19 लाख कोटी रुपयाच्या बाजारमूल्यासोबत देशातील 18 वी सर्वात मौल्यवान कंपनी राहिली आहे. कंपनीच्या समभागात तेजी राहिल्याने बाजारमूल्यात वाढ झाल्याचे ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टच्या एका अहवालात सांगितले आहे.
1000 टक्क्यांचा परतावा
आयसीआयसीआय डायरेक्टने एव्हेन्यू सुपरमार्ट्स् सप्टेंबरमध्ये निफ्टीत समावेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. ही कंपनी मार्च 2017 रोजी लिस्ट झाली होती. मागील चार वर्षांत आपल्या इश्यू प्राईसमधून 1000 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा कंपनीने दिला आहे.