केजरीवाल यांच्या कार्याचे केले तोंडभर कौतुक
प्रतिनिधी /पणजी
माजी उप. मुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्याचे तोंडभर कौतुक केले. म्हणुनच गोव्याला केजरीवाल मॉडेलची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आपच्या पणजी मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर वरिष्ट उपाध्यक्ष महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो, फोंडा विधानसभा मतदारसंघ प्रभारी ऍड. सुरेल तिळवे, बाणावली प्रभारी कॅप्टन वेन्झी व्हिएगश, यांची उपस्थिती होती. श्री. नाईक यांनी दयानंद नार्वेकर यांचे पक्षात स्वागत केले.
पाच वेळा आमदारकीच्या काळात अनेक कॅबिनेट मंत्रीपदांसह सर्वात तरुण सभापता ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत कार्य केलेल्या नार्वेकर यांनी 1977-1989 थिवी मतदारसंघातून सर्वप्रथम जनतेचे प्रतिनिधित्व केले होते. 1985 मध्ये ते सभापती होते.
नार्वेकर यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव असून त्याचा मोठा लाभ आम आदमी पक्षाला होणार आहे. त्यांचा अनुभव ही आपसाठी एक मोठी उपलब्धी असेल, अशी प्रतिक्रिया तिळवे यांनी व्यक्त केली.
त्यावेळी बोलताना नार्वेकर यांनी केजरीवाल यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. आप एक सुव्यवस्थित पक्ष असल्याचेही ते म्हणाले. केजरीवाल यांनी राबविलेल्या योजना व त्यांचे कार्य पाहून आपण खूप प्रभावित झालो. असे काम अन्य राज्यातही करणे शक्य आहे हे आपणास भावले असे ते पुढे म्हणाले.
आपचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. आपने आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. देशभरातील सुविद्य नागरिक नेहमीच आम आदमी पक्षाचे कौतुक करतात. महामारीच्या काळात आपने आदर्श काम केले आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल यांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना त्यांनी दिल्लीतील अमुलाग्र बदल घडविलेल्या सरकारी शाळा देशातील सर्वोत्तम मानल्या जातात, असे सांगितले. खाजगी शाळांच्या तुलनेत येथे विद्यार्थी प्रत्यक्षात करिअर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि वाढू शकतात.
त्याचबरोबर केजरीवाल यांचे हेल्थकेअर मॉडेल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून त्यातून गोव्यात चमत्कार घडेल, असे सांगून पुढील पाच वर्षांसाठी आपणास काम करण्याची संधी व व्यासपीठ दिल्याबद्दल नार्वेकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.
महादेव नाईक यांनी नार्वेकर यांचे पक्षात स्वागत करताना आपणास आनंद होत असल्याचे सांगितले. नार्वेकर यांचे समाजकार्य सर्वश्रुत असून त्यांनी योग्यवेळी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नार्वेकर एक उत्तम वक्ते असून गोव्यात त्यांचे प्रचंड चाहते आहेत. आपण त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे, असे नाईक म्हणाले.