युक्रेनवर कब्जा करण्यास विलंब होत असल्याने पुतीन संतप्त
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर जेलेंस्की हे रशियाच्या आक्रमणाला निकराने तोंड देत आहेत. व्लोदिमिर जेलेंस्की आता एक जागतिक नायक ठरले आहेत. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे युद्ध लवकरात लवकर संपवू पाहत आहेत. परंतु विजय प्राप्त करण्याच्या प्रयत्नांना विलंब होत असल्याने ते नाराज झाले आहेत. युक्रेनविरोधी युद्धाकरता रशियाला दरदिनी 20 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागत असल्याचा दावा युरोपीय महासंघाचे खासदार रिहो टेरास यांनी केला आहे. तसेच अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाच्या विरोधातील स्वतःचे निर्बंध अधिकच कठोर केले आहेत.
युक्रेनवर विजय प्राप्त करण्याचे प्रयत्न रखडल्याने पुतीन अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येतेय. रशियाचे मनुष्यबळ युक्रेनच्या तुलनेत अधिक आहे, रशिया अखेरीस युक्रेनला पराभूत करणार असल्याचे व्यापक स्वरुपात मानले जाते. परंतु या छोटय़ा देशाने आश्चर्यकारकरित्या प्रभावी बचावाचे प्रदर्शन करत रशियाच्या सैन्य प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचविला आहे. क्रेमलिन अद्याप युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करणे आणि स्वतःचे सरकार प्रस्थापित करण्याच्या स्वतःच्या उद्देशापासून दूर आहे.
रशियाकडे सामरिक योजना नाही
युक्रेनने शनिवारी रशियाला एक मोठा झटका दिला. देशाचे अध्यक्ष व्लोदिमिर जेलेंस्की यांच्या हत्येसाठी पाठविण्यात आलेल्या चेचन विशेष दलांच्या एक मोठय़घ् समुहाचा खात्मा करण्यात आला आहे. चेचन सशस्त्र समूह स्वतःचे क्रौर्य आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी कुख्यात आहे. युरोपीय महासंघाचे खासदार रिहो टेरास यांनीही रशियाच्या हल्ल्यावरून मोठा दावा केला आहे. हे युद्ध अत्यंत सोपे असेल आणि 1-4 दिवसात सर्वकाही संपून जाईल असे पुतीन यांचे मानणे होते. परंतु सद्यस्थिती पाहता असे वाटत नसल्याने पुतीन बिथरल्याचे टेरास म्हणाले. टेरास हे एस्टोनिया या देशातील राजकीय नेते आणि माजी सैन्याधिकारी आहेत. ते 1 फेब्रुवारी 2020 पासून युरोपीय खासदार म्हणून काम करत आहेत. 2011-18 पर्यंत ते एस्टोनियाच्या सैन्याचे प्रमुख होते. रशियाच्या सैन्याकडे सामरिक योजना नव्हती. युद्धाचा खर्च जवळपास 20 अब्ज डॉलर्स प्रतिदिन इतका आहे. कुठल्याही देशाकडे रॉकेट अधिकाधिक 3-4 दिवसांसाठी असतात, त्यांचा वापरही कमीच केला जातो. अशा स्थितीत रशियाकडे शस्त्रास्त्रांची कमतरता असावी असे मत टेरास यांनी व्यक्त केले आहे.
जलद शस्त्रास्त्रनिर्मिती अवघड
तुला आणि रोटेनबर्ग प्रकल्प रशियन सैन्याच्या शस्त्रास्त्रांची कमतरता पूर्ण करू शकत नाहीत. ते केवळ रायफल आणि गोळय़ांचा पुरवठा करू शकतात. रशियाच्या सैन्यासाठी शस्त्रास्त्रs पुढील 3-4 महिन्यांमध्ये तयार होऊ शकतात, ते देखील त्यांच्याकडे पुरेसा कच्चा माल असेल तरच. रशियाच्या शस्त्रास्त्रांसाठी स्लोवेनिया, फिनलंड आणि जर्मनीमधून कच्चा माल पुरविला जात होता, परंतु आता निर्बंधांमध्ये तो बंद झाला आहे.