ऋणनिर्देश सोहळय़ात सुदिन ढवळीकरांचे उद्गार
वार्ताहर /मडकई
राजभवनमधील दरबार हॉलची निर्मिती माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात आपण सार्वजनीक बांधकाममंत्री असताना केली होती. याच दरबार हॉलमध्ये मंत्री म्हणून पहिल्यांदा शपथविधीचा मान लाभला. हा सुखद योगायोग म्हणावा लागले. जनतेच्या आशिर्वादामुळे मोठय़ा आजारातून वाचलो आणि हे भाग्य आपल्या निशिबी आले, अशी भावना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथील ऋणनिर्देश सोहळय़ात व्यक्त केली.
बांदोडा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर मगो पक्ष व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे हा ऋणनिर्देश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, प्रिया च्यारी, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक व मगो युवा नेते मिथील ढवळीकर, बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावकर, कुंडईचे सरपंच विश्वास फडते, मडकईच्या सरपंचा लक्ष्मी तारी, दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य वामन नाईक, अजय नाईक, साईशा नाईक, विशाखा गावडे, सोनाली तेंडुलकर, दुपदा नाईक, मनोज बोरकर, मनुजा नाईक, केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष प्रताप फडते, अनंत नाईक तसेच अन्य पंचसदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
मगो पक्ष कदापी सोडणार नाही
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी यापूर्वी आपल्याला काँग्रेस पक्षात तर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी भाजपात प्रवेश करण्याची निमंत्रण दिले होते. त्यासाठी मोठी आमिशेही दाखवली. मात्र ज्या मगो पक्षाने आपली राजकीय कारकिर्द घडवली, त्या पक्षाशी कधीच प्रतारणा केली नाही. यापुढेही मगो पक्षाशी एकनिष्ठ राहीन असे ढवळीकर यांनी जाहीर केले. मडकईतील जनतेचे सलग सहा वेळा विक्रमी मतांनी निवडून दिले. या ऋणातून उतराई होता येणार नाही, असेही भावोद्गार त्यांनी काढले.
जनकल्याणार्थ राबवीलेल्या प्रकल्पांना विरोध मंत्री सुदिन ढवळीकर
मडकई मतदार संघातील महत्त्वाचे प्रकल्प जनतेच्या कल्याणासाठी उभारताना प्रचंड विरोध झाला. त्यासाठी न्यायालयात जावे लागले. पण विकासात खंड पडू दिला नाही. जिद्द व चिकाटीने भाऊसाहेब बांदोडकर मैदान, उंडीर ते तिस्क पर्यंतचा रस्ता व पूल, आडपईचा फेरी धक्का, मडकई ते कुंडइं& पर्यतची जलवाहिनी, उंडीर बांदोडा व कवळेचा मलनिस्सारण प्रकल्प असे कितीतरी महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले. येणाऱया काळात फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे मैदान विकसीत केले जाईल. मात्र विरोधकांनी विरोध न करता सहकार्य करावे. मडकई मतदार संघातील सर्व रस्ते येत्या सहा महिन्यांत हॉटमिक्स होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश कवळेकर म्हणाले, मंत्री सुदिन ढवळीकरांच्या नियोजनामुळे अनेक प्रकारची विकासकामे पूर्णत्त्वास आली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी दिलेल्या नोकऱयांची गणनाच होऊ शकत नाही. युवकांनी इतर नवीन पक्षात न जाता त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
राजेश नाईक म्हणाले, मंत्री सुदिन ढवळीकरांचे कार्य पाहून त्यांना 14 हजार नव्हे तर सर्व 28 हजारही मते मिळायला हवीत. कठिण प्रसंगी ते नेहमीच लोकांच्या मदतीला धावत असून याच कार्यातून त्यांच्यातील मोठेपणा दिसून येतो. गणपत नाईक यांनी सुदिन ढवळीकरांच्या कार्याचा आढावा घेतला.
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व अन्य मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत मिथील ढवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत नागेशकर यांनी तर सलोनी गावडे यांनी आभार मानले.
त्यानंतर ‘सारेगमप’ चे महानायक अभिजित कोसंबी, नेहा कळसुलकर, लक्ष्मण नाईक यांची गायनाची मैफल झाली. नंतर अस्मिता चिंचाळकर व चिन्मय जोगळेकर यांचे नाटय़सादरीकरण व नैना रणदिवे यांनी नृत्य सादर केले. डी महेश यांची मिमिक्री झाली.