रिवा फुटबॉल क्लब हरियाणा संघाला विजेतेपद
बेळगाव : विठ्ठलराव जोशी ट्रस्ट दरवन (चिपळूण) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दरवन एनर्जिया फुटबॉल चषक आंतरराज्य निमंत्रितांच्या 15 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिवा फुटबॉल क्लब हरियाणा संघाने बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मानस संघाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चिपळूण येथे झालेल्या विठ्ठलराव जोशी ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाने कोल्हापूरच्या ताराराणी फुटबॉल क्लब संघावर 4-1 असा विजय मिळविला. मानसतर्फे अलीसा बोर्जेसने 2, जिया मुल्ला व विद्या यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱया सामन्यात हरियाणाच्या रिवा फुटबॉल क्लब संघाने मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाचा 2-0 असा पराभव केला. पुन्हा या स्पर्धेत परतीच्या लढतीत मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाने ताराराणी फुटबॉल क्लब संघावर 1-0 असा निसटता विजय संपादन केला. हा एकमेव विजयी गोल अलीसा बोर्जेसने केला. शेवटच्या साखळी सामन्यात रिवा फुटबॉल क्लब संघाने मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघावर 1-0 अशा विजय संपादन केला.
अंतिम फेरीत मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाने रिवा फुटबॉल क्लबला संपूर्ण सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यानंतर झालेल्या अतिरिक्त वेळेतील पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात रिवा फुटबॉल क्लबच्या रिना कौर हिने गोल नोंदवला. या एकमेव गोलाच्या जोरावर रिवा फुटबॉल क्लब हरियाना संघाने विजेतेपद पटकाविले. बेळगावातून पहिल्यांदाच 15 वर्षांखालील मुलींच्या मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाने महाराष्ट्रातील स्पर्धेत भाग घेत उपविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले.