स्वतःचे एक घर असावे, ज्यात निवांतपणे राहून स्वतःच्या कुटुंबाला सुख देता येईल अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्वप्नांमधील आलिशान घर प्रत्येक जण इच्छितो. लोक जीवनभर घरासाठी कमाई करतात आणि मग ती कमाई घराच्या उभारणीसाठी खर्च करतात. जितके मोठे घर तितका अधिक खर्च होतो. परंतु ब्रिटनमध्ये एका दरवाज्याइतके घर कोटय़वधी रुपयांमध्ये विकण्यासाठी तयार आहे.
या घराची किंमत एक कोटी रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या घराची रुंदी एका दरवाजाइतकीच आहे. परंतु या घरात अनेक वैशिष्टय़े देखील आहेत. हे छोटेसे दिसणारे घर दोन मोठय़ा घरांदरम्यान तयार करण्यात आले आहे. या घराला सॉमरसेटच्या सेलवर नोंदविण्यात आले आहे.
या घराला बॅकबीट कॉटेज नाव देण्यात आले असून लवकरच याचा लिलाव सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वीच हे घर चर्चेचा विषय ठरले आहे. यामध्ये एक बेडरुम असून यात गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तळमजल्यावर लिव्हिंग रुम आणि किचन आहे. जिन्यांवरून वर गेल्यावर एक प्रशस्त बेडरुम दिसते. विकसित देशांमध्ये छोटय़ा आणि कमी सामान सामावू शकणाऱया घरांचे प्रचलन वाढत आहे. अशी घरे खूपच महाग असतात. अधिक सामानापासून वाचण्यासाठी लोक अशा घरांना प्राधान्य देत आहेत. सर्व सुविधा असणारे आणि कमीत कमी जागा वाया घालविणारे घर सर्वांना हवेहवेसे वाटू लागले आहे.
बाहेरून पाहिल्यास हे घर छोटे वाटत असले तरीही याच्या आतमध्ये अनेक गुपिते दिसून येतील. येथे वुड बर्निंग स्टोव्ह, सुंदर खिडक्या आणि सिलिंग्स आहे. 14 एप्रिलपर्यंत या घराकरता बोली लावता येणार आहे. ऑक्शनर स्कॉट ग्रे यांच्यानुसार हे घर कुणीही खरेदी करू शकतो.