अक्कलकोट / प्रतिनिधी
तालुक्यातील शिरवळ येथील एक दरोडा व घरफोडीचे ०६ असे एकूण ०७ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक करून त्याच्याकडुन १८ लाख ७६ हजार 800 रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांना यश आले. आरोपी सनिदेवल सुरेश काळे (वय २५ वर्ष) रा. सुखी पिंपरी ता. पुर्णा जि. परभणी असे आरोपीचे नांव आहे. आरोपीने इतर साथिदारामार्फत हे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. सदरची उल्लेखनीय कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली झाली.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या कामगिरी करता शिरवळ ता. अक्कलकोट येथील दरोडे यासह हन्नुर, चप्पळगाव, पानमंगरुळ, तडवळ व मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडीचे ०६ गुन्हे यासह एकूण ०७ गुन्ह्यांची उकल होऊन ३९.१ तोळे सोन्याचे दागिने व ८ तोळे चांदीचे दागिने असे एकूण १८ लाख ७६ हजार आठशे रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
शिरवळ ता.अक्कलकोट येथे फिर्यादी शांताबाई कोळेकर (वय ६० वर्षे) या त्यांचे पतीसह राहणेस असून दिनांक २९/१०/२०२१ रोजी पहाटे ०२:०० वा. च्या सुमारास त्यांच्या राहते घरी शिरवळ येथे अज्ञात ६ दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादीस व फिर्यादीच्या पतीस लाकडाने मारहाण करून त्यांना जखमी करून ३ लाख १६ हजार रू. सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच यातील साक्षिदार सविता माने यांनाही मारहाण करून त्यांचे घरातील २,८०,५०० रू. किंमतीचे सोन्याचे दागिने व घरातील रोख रक्कम असा एकूण ५,९६,५०० रू. किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून घेऊन गेले होते. सदर घटनेबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. तसेच गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मौजे पानमंगरूळ ता. अक्कलकोट येथील राहणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांने त्याचे इतर नातेवाईकांना सोबत घेवून केले असल्याची माहिती मिळाली. दरम्यान तो सातारा, मिरज येथे गेले असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जावून त्याचा शोध घेतला होता. त्याचे मागावर पोलीस पथक असल्याची त्यास माहिती मिळाल्याने तो जिल्हा सोडून परभणी जिल्हयात गेला होता.
संशयित आरोपी हा परभणी जिल्हयातील पुर्णा पोलीस ठाणे ( परभणी ) गुरंन २८२/२०२० भादविसंक ३०२ मध्ये पाहिजे आरोपी असल्याने त्यास परभणी पोलीसांनी पकडले होते. त्याने शिरवळ येथील दरोडा केले असल्याचे पथकाकडे माहिती असल्याने त्यास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे दाखल गुन्हयात वर्ग करून घेतल्यानंतर सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्याने त्याचे इतर नातेवाईकांना सोबत घेवून मौजे शिरवळ (१ दरोडा ) गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने अक्कलकोट तालुक्यातील मौजे हन्नूर (२ गुन्हे ), चपळगांव (१ गुन्हा ), पानमंगरूळ (१ गुन्हा ), तडवळ१ गुन्हा व मोहोळ तालुक्यातील सौंदणे (१ गुन्हा ) असे ०१ दरोडा व घरफोडीचे ०६ असे एकूण ०७ गुन्हे त्याचे इतर साथिदारामार्फत केले असल्याची कबुली दिली. सर्व गुन्हयांत एकूण ३९.१ तोळे सोन्याचे दागिने व ८ तोळे चांदीचे दागिने असा एकूण १८, लाख ७६ हजार आठशे रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.