किणये घाटात दहशत माजविणाऱया पाच दरोडेखोरांना अटक, चार गुन्हे केल्याचे उघड
प्रतिनिधी / बेळगाव
किणये घाटात मालवाहू वाहनांची दोरी कापून लुटण्याचा प्रयत्न करणाऱया पाच दरोडेखोरांना सोमवारी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या टोळीने दहशत माजविली होती. रात्रीच्यावेळी बेळगावहून गोव्याला जाणाऱया वाहनांना हे दरोडेखोर लक्ष्य बनवत होते. अटक करण्यात आलेले सर्व पाच जण वीट भट्टीतील कामगार आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दरोडेखोरांच्या मुसक्मया आवळल्या आहेत. या सर्व पाच जणांवर भा.दं.वि. 398 कलमान्वये बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
निंगाप्पा सिद्धाप्पा नाईक (वय 35), सिद्धाप्पा भीमाप्पा नाईक (वय 25), भीमाप्पा सिद्धाप्पा नाईक (वय 45), भरमाप्पा निंगाप्पा पुजारी (वय 24, सर्व रा. भरनट्टी, ता. बेळगाव), मारुती निंगाप्पा नाईक (वय 26, रा. कमलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय तपासणी व कोरोना चाचणीनंतर या पाच जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या टोळीने गेल्या पाच महिन्यात चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गेल्या डिसेंबर 2020 पासून बेळगावहून गोव्याला जाणारी भाजीवाहू व इतर मालवाहू वाहनांची दोरी कापून माल पळविण्याचे प्रकार सुरू होते. बेळगावहून सुटणारी वाहने किणयेजवळ येताच दोरी कापून त्यामधील साहित्य बाहेर टाकण्यात येत होते आणि ही वाहने तेथून गेली की दरोडेखोर हे साहित्य गोळा करुन नेत होते. सुरूवातीला पोलिसांनी या परिसरात दरोडेखोरांचा वावर आहे यावर विश्वास ठेवला नव्हता. व्यापाऱयांनी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेवून दरोडेखोरांच्या मुसक्मया आवळण्याची मागणी केली होती. बेळगाव दौऱयावर आलेले गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले होते. गेल्या महिन्यात एका ट्रक चालकावर विळा फेकण्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली.
पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली डी. ए. चौगुला, योगेश तळवार, चन्नाप्पा हुंचाळ, नारायण चिप्पलकट्टी, गोविंद पुजारी, मल्लिकार्जुन गाडवी, सुरेश लोकूर, आदींचा समावेश असलेल्या पथकाने किणये घाटात पाळत ठेवून गस्त वाढविली. रविवारी मध्यरात्रीनंतर दरोडय़ाच्या प्रयत्नात असताना या पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले.
कमलनगर, काटगाळीत काम
या दरोडेखोरांच्या टोळीतील सिद्धाप्पा नाईक याच्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात यापूर्वी एफआयआर दाखल झाले आहे. उर्वरित चौघे जण नवखे आहेत. कमलनगर व काटगाळी येथील वीट भट्टीत हे सर्व जण काम करतात. रात्री 9 नंतर हे सर्व जण एकत्र यायचे. रंगीत पार्टी करायचे. त्यानंतर बेळगाव-जांबोटी रोडवर दरोडय़ासाठी ते मैदानात उतरायचे. या दरोडेखोरांनी चारवेळा मालवाहू वाहने लुटण्याचा प्रयत्न केले असले तरी वाहन चालकांच्या प्रसंगावधानामुळे या दरोडेखोरांच्या हाती फार काही लागले नाही. मात्र या टोळीने चांगलीच दहशत माजविली होती. मोठय़ा प्रमाणात लुटमार करुन पैसे कमविण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र त्याआधीच ही टोळी पोलिसांच्या जाळय़ात अडकली आहे.