प्रतिनिधी/ सातारा
पोवईनाका येथील कराड अर्बन बॅकेच्या शाखेत एन.आर. शेठ आणि कंपनी येथे काम करणारा अरुण धर्मराज गुजंले हा 1 लाख 52 हजार 500 रूपये जमा करण्यासाठी मोपेड गाडीतून निघाला होता. यावेळी पोवईनाका येथे आल्यावर ऍव्हेजर गाडीवरील 4 इसमांनी त्यांच्या मोपेड गाडीस गाडी धडकवून आमच्या गाडीस तुझी गाडी का धडकवलीस असे म्हणत अरुण गुंजले याला मारहाण केली. व स्प्लेंडर गाडीवरील एक इसम याने अरुण यांच्या मोपेड गाडीतील डिकीतून दरोडा टाकून पैसे चोरून नेले. या चोरीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या 48 तासाच्या आत 3 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ऋषीकेश उर्फ शुभम हनुमंत साठे (वय 21, रा. ढोरगल्ली मल्हारपेठ सातारा), गौरव अशोक भिसे(वय 20, रा. ढोरगल्ली मल्हारपेठ सातारा), राकेश कृष्णा सोनकांबळे (वय 20, रा. बाबर कॉलनी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सहायक फौजदार उत्तम दबडे यांच्या तपास पथकाने गुह्याच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ही संपूर्ण घटना तिथे असणाऱया सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा तपास सुरू झाला. दि. 27 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास याच गुह्यातील तीन पैकी एक आरोपी शुभम हणुमंत साठे हा ढोरगल्ली येथील राहत्या घराच्या छतावर बसलेला असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा लाऊन शुभमसह गौरव व राकेश याना अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी 51 हजार 500 रोख रक्कम, 20 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट व 30 हजार रूपये किंमतीची एक यामाहा एस.झेड मोटार सायकल असा एकुण 1 लाख 1 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलीस हवालदार अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, अमित सपकाळ, शिवाजी भिसे, अमोल माने, स्वप्नील माने, विशाल पवार, प्रविण पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी घेतला.