एफसी गोवा, सेसा गोवा संघादरम्यान सामने
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या दर्शन युनायटेड फुटबॉल संघाने गोवा दौऱयात दोन प्रो लीग संघांबरोबर सामने खेळून आपल्या दौऱयाची सांगता केली आहे.
दर्शन युनायटेड फुटबॉल संघाचे दरवषी विविध ठिकाणी दौरे केले जातात. यावर्षी या संघाने गोवा दौरा आयोजित केला होता. या दौऱयात विविध फुटबॉल मैदानाना भेटी देणे, ज्येष्ठ खेळाडू, ज्येष्ठ प्रशिक्षक, ज्येष्ठ फुटबॉल तज्ञ यांच्याशी भेट घेत संघाने माहिती करून घेतली. त्याचप्रमाणे गोव्यामधील प्रो लीग खेळणाऱया एफसी गोवा डेव्हलपमेंट संघ आणि सेसा फुटबॉल अकादमी म्हापसा संघाविरुद्ध काही सामने खेळले. दर्शन युनायटेडतर्फे बेळगावातील होतकरू फुटबॉलपटूंना संधी मिळवून देण्यात येते. विविध ठिकाणी या खेळाडूंना नेण्यात येते आणि तेथील स्थानिक व इतर संघांविरुद्ध सामने खेळविले जातात. या अनुभवातून त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळते. या संघाला विजय रेडेकर यांचे मार्गदर्शन व दर्शन युनायटेडचे संचालक श्रीकांत देसाई यांचे प्रोत्साहन लाभत आहे. श्रीकांत देसाई यांनी दर्शन युनायटेड फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून होतकरू फुटबॉलपटूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.