निपाणीत दलित समाज बांधवांची बैठक
प्रतिनिधी / निपाणी
दलित समाजाच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस खाते प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन चिकोडीचे डीएसपी मनोजकुमार नायक यांनी केले. ते निपाणी येथील शहर पोलीस स्थानकाच्या आवारात आयोजित दलित समाज बांधवांच्या बैठकीत बोलत होते.
नायक म्हणाले, निपाणीसह परिसरातील सर्व गावांमध्ये सर्वच समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. हाच सलोखा कायम राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर एखादा अनुचित प्रकार घडत असल्यास परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची कल्पना द्यावी. जेणेकरून त्वरित त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना पाऊल उचलणे सोपे ठरेल. दलित समाजाच्या असलेल्या समस्याही सोडविण्यासाठी पोलीस खाते प्रयत्न करीत आहे.
सीपीआय संतोष सत्यनायक, शहर फौजदार अनिलकुमार कुंभार, ग्रामीणचे फौजदार बी. एस. तळवार, खडकलाटचे फौजदार मंटूर, बीसीपीएसच्या फौजदार अनिता राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीस अशोककुमार असोदे, प्रा. सुरेश कांबळे, अशोक लाखे, बबन गोसावी, विठ्ठल डावाळे, केंपण्णा कांबळे, विजय सटाले यांच्यासह परिसरातील दलित समाज बांधव उपस्थित होते.