कोल्हापूर/प्रतिनिधी
दळवी आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये अभिजात चित्र कलेचे शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या शैक्षणिक वर्षातील निवडक कलाकृतीच्या चित्र प्रदर्शनास उद्यापासून सुरूवात होणार आहे. तीन दिवस चालणार्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, मंगळवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांच्या शुभ हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, कला दालन येथे 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2020 अखेर सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत सर्व कला रसिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयच्या मार्फत आयोजित राज्य कला प्रदर्शनात प्रतिष्ठेची निवड झालेल्या कलाकृतीमध्ये फौंडेशन वर्गातून वेद वायचळ, धोंडी ढवळे, ऋतुजा जाधव, प्रथमेश पाटील, आदित्य पोतदार, प्रथमेश काजवे, साक्षी पांगीरे, केदार पवार, कैलास मसुरकर, सानिका नाईक, इंटर वर्गातून अरिहत किनिंगे, ऍडव्हान्स वर्गातून राहुल कोकितकर, डिप्लोमा वर्गातून अक्षय जाधव, प्राप्ती लोखंडे, पंकज गवंडे, वैभव पाटील, आकाश मोरे तसेच इलेमेंटरी वर्गातुन प्रनोती संपत चौगुले या विद्यार्थीनीची पुरस्कार प्राप्त स्तीरचित्र कलाकृती देखील बघावयास मिळेल. तसेच या प्रसंगी महाविद्यालय अंतर्गत वार्षिक बक्षीस वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात वत्सलाताई पाटील, दळवीज आर्ट्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, सेक्रेटरी अर्चनाताई आंबीलढोक, विश्वस्त माजी आमदार बाबासाहेब पाटील, प्राध्यापिका सरीताताई माने, वसंतराव देशमुख, अँड. धनंजय माने आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.