घरात गुप्त जागी लपवून ठेवली होती रक्कम, प्रकरण सकृत दर्शनी हवालाचे
प्रतिनिधी/ मडगाव
आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी शनिवारी सायंकाळी मडगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतारवर असलेल्या दवर्ली गावातील एका जागी धाड घालून 6.20 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. 6.20 लाखाची ही रक्कम घरात एक खास जागा करुन त्या जागेत ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीवेळी या रकमेचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे खात्याचे म्हणणे आहे.
नेमकी धाड कोठे
आयकर अधिकाऱयांनी ही धाड दवर्ली गावातील व्हिर्जीनकर कॉलनीतील एका खिस्ती व्यक्तीच्या घरावर ही धाड घातली. हे घर जरी ख्रिस्ती व्यक्तीच्या नावावर असले तरी ते घर एका मारवाडय़ाला भाडय़ाने दिलेले होते. याच घरात भाडोत्री म्हणून राहणाऱया या मारवाडय़ाला आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतलेले आहे.
आयकर खात्याला खात्रीलायक माहिती मिळालेली होती. खात्रीलायक माहिती देणारी व्यक्ती राज्य शासनाच्या पोलीस खात्यातील एक महत्वाच्या पदावरील पोलीस अधिकारी होता. अर्थातच आयकर खात्याने या माहितीवर विश्वास ठेवला आणि शनिवारी सायंकाळी उशिरा वरील जागी धाड घातली.
आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी या घराचा कानोन् कोपरा तपासला आणि त्यामुळेच या घराच्या एका जागी जमिनीखाली लपवून ठेवलेल्या जागी ही जी रक्कम लपवून ठेवली होती ती आयकर खात्याच्या अधिकाऱयांच्या हाती लागली. मोजली तेव्हा ही रक्कम सुमारे 6 कोटी 20 लाख इतकी होती. या रोख रकमेबरोबरच या गुप्त जागी आणखी बरीच मौलीक कागदपत्रे खात्याच्या हाती लागलेली आहेत अशी सुत्रानी माहिती दिली.
ही रक्कम कोणासाठी?
सध्या गोवा विधानसभेसाठी निवडणुकीची तयारी चालू आहे. राज्यातील तसेच परराज्यातील अनेक पक्ष गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. येन केन प्रकारे गोवा विधानसभेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न चालू असून त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष जोरदार प्रयत्न करीत आहेत.
याच पार्श्वभूमीवर 6.20 कोटीची रक्कम सापडल्यामुळे अनेक तर्क वितर्क सुरु झालेले आहेत. सरकारी अधिकाऱयांचे म्हणणे असे की ही रक्कम मतदारांना लुभावण्यासाठी वापरली जाणार होती तर ताब्यात घेतलेल्या या संशयिताचे म्हणणे की ही रक्कम हार्डवेअर व्यापाऱयांची आहे.