प्रतिनिधी/ मडगाव
दवर्ली येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला सुरा खुपसून मुझाहीदखान कानाझडे या 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दवर्ली येथे राहणारे सादीक बेल्लारी उर्फ लोली व इस्माईल मुल्ला उर्फ छोटू या दोन्ही आरोपींना कुडतरी पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रावाडो -फातोर्डा येथे राहणारे कपडय़ाचे व्यापारी तथा मयताचा भाऊ कबीरखान कानाझडे (30) यांनी या खून प्रकरणी कुडतरी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मे 2020 रोजी रात्री अंदाजे 11 वाजले होते. मयत मुझाहीदखान कानाझडे व त्याचे काही सहकारी दवर्ली येथे बसले होते. इतक्यात आरोपी दुचाकीवरुन तेथे आले आणि मयताला आव्हानात्मक टोमणा मारला. ‘मागील हल्ला पुरे झाला ना की आणखी पाहिजे’ अशा प्रकारचा तो टोमणा होता.
उपचारादरम्यान मृत्यू
इतक्यात एका आरोपीने लोखंडी सळी मयताच्या डोक्यावर हाणली तर दुसऱया आरोपीने सुरा मयताचा पोटात खुपसला. गंभीररित्या जखमी झालेल्या मुझाहीदखान याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना त्याला मृत्यू आला.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर 12.30 वाजण्याच्या सुमाराला तक्रारदाराला त्याच्या दुसऱया एका भावाचा फोन आला आणि मुझाहीदखान याच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू असल्याची माहिती दिली. तक्रारदार जेव्हा सरकारी इस्पितळाजवळ आला तेव्हा काही वेळाने त्यांना गंभीररित्या जखमी असलेला आपला भाऊ मुझाहीदखानला उपचार चालू असताना मृत्यू आला असल्याचे कळले.
काही तासातच आरोपी जेरबंद
त्यानंतर ही खबर कुडतरी पोलिसांना कळाली. एव्हाना या खून प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाले होते. त्यांना पकडण्यात कुडतरी पोलिसांना यश आले. आरोपींना न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या दोन्ही संशयित आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरवींद गावस तसेच पोलीस अधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर व त्यांच्या सहकाऱयांनी या खून प्रकरणाचा तपास करुन आरोपींना अटक केली.
4 दिवसात 2 खून
चार दिवसात खुनाच्या दोन घटना कुडतरी पोलीस स्थानकाच्या हृद्दीत घडल्या आणि दोन्ही खून प्रकरणांचा तपास पोलिसांनी 12 तासाच्या आत लावला.
24 मे रोजीच्या रात्री कोल्ह्यादोंगर -राय येथे पहिला खून झाला. तेथे मूळ झारखंड येथील व नात्याने भावोजी असलेल्या विवेकसिंग याने आपलाच मेहुणा मुकेश सिंग याच्या डोक्यावर कुऱहाडीचे घाव घालून खून केला. काही तासातच फरारी आरोपीला अटक करण्यात आली होती.
24 तारखेनंतर अवघ्या चारच दिवसांनी म्हणजे 28 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला दवर्ली येथे खुनाची दुसरी घटना घडली. महत्वाचे म्हणजे दोन्ही खुनाच्या घटना रात्री 10 ते 12 या दरम्यान घडल्या आणि दोन्ही प्रकरणातील आरोपींना काही तासातच अटक करण्यात तपास यंत्रणेने यश मिळवले.