दोन्ही गटांतर्फे पोलीस तक्रारी जयेश व त्यांच्या मुलाला मारहाण
प्रतिनिधी /मडगाव
भगवती-दवर्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात काल रविवारी सकाळी दोन गटात ईद-ए-मिलाद निमित्त लावण्यात आलेला झेंडा काढण्यावरून तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोन्ही गटांकडून मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात परस्पर तक्रारी नोंद करण्यात आलेल्या आहेत. या तणावात मंदिराचे प्रमुख जयेश नाईक व त्यांचा मुलगा ओम नाईक यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलीस तपास करीत असून पोलीस एकूण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, जयेश नाईक व त्यांचा मुलगा ओम नाईक हे मंदिराच्या परिसरात वाढलेल्या झुडपाची हे साफ सफाई करीत होते. यावेळी त्यांना ईद-ए-मिलाद निमित्त लावण्यात आलेला झेंडा आढळून आला. हा झेंडा काढावा अशी विनंती त्यांनी येथील मुस्लिम बांधवाना केली असता, ही विनंती फेटाळण्यात आली. त्यावेळी हा झेंडा काढण्यासाठी जयेश नाईक हे स्वता पुढे सरसावले असताना तणाव निर्माण झाला.
जयेश नाईक व उपस्थितांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली व प्रकरण हातघाईवर आले. त्यावेळी जयेश नाईक यांच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी सळी मारण्यात आली. त्यात ते जखमी झाले. वडिलांना मारहाण केल्याने मुलगा ओम नाईक हा मदतीसाठी पुढे आला असता, त्याच्या तोंडावर ही ठोसा हाणून त्याला ही जखमी करण्यात आले. या वेळी बराच तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचा ताबा असलेले निरीक्षक कपिल नायक हे पोलीस बंदोबस्तासह समर्थ गडावर दाखल झाले व त्यांनी एकूण परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
दोन्ही गटांच्या वतीने पोलीस तक्रार
जयेश रघुनाथ नाईक यांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली असून या तक्रारीत सकाळी 11.30 वा. दवर्ली येथील सलमान आणि अन्य दोघांनी जाणून बुजून श्री स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात प्रवेश केला व आपल्याला तसेच मुलगा ओम नाईक याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर दुसऱया गटा तर्फे श्रीमती परवीन खान यांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करून जयेश नाईक व त्यांच्या मुलाने ‘ईद’ सणानिमित्त लावलेल्या धार्मिक झेंडय़ाची दोरी कापून हा झेंडा जमीनवर पाडून धार्मिक भावना दुःखावल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी श्रीमती मुनिया खान या महिलेला शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. जयेश नाईक यांनी श्रीमती मुनिया खान या महिलेच्या घराच्या छप्पराची मोडतोड करून कोयत्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक करिष्मा प्रभू या प्रकरणी तपास करीत आहेत.