प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दि. 17 ऑक्टोबरपासून नऊ दिवस दसरा सण साजरा केला जाणार आहे. तसेच दि. 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणाकरिता राज्य सरकारने स्वतंत्र मार्गसूची जारी केली असून दसरा आणि दिवाळी साधेपणाने आणि भक्तिभावाने साजरी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरची सक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी यासंबंधीचा आदेश बुधवारी बजावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा आणि दिवाळी साजरी करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जारी केलेल्या मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक आहे. महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर खातेप्रमुखांना या मार्गसूचीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
म्हैसूर वगळता राज्यातील इतर ठिकाणी कार्यक्रमात एकाचवेळी 10 पेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये, सामाजिक अंतर राखावे, सामाजिक अंतराशिवाय कार्यक्रम, धार्मिक विधींचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सॅनिटायझरचा वापर किंवा हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था, मास्कचा वापर करावा. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेऊन दसरा साजरा करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
म्हैसूर दसरोत्सवासाठी
स्वतंत्र मार्गसूची
म्हैसूरमधील ऐतिहासिक दसरोत्सवासाठी वेगळी मार्गसूची असणार आहे. म्हैसूर राजवाडा आवारात सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास सुचवले आहे.
चामुंडी टेकडीवर दसरा उद्घाटनावेळी 200 पेक्षा कमी जणांची उपस्थिती असावी. राजवाडय़ातील सांस्कृतिक कार्यक्रमात 50 पेक्षा कमी जणांची उपस्थिती तसेच जम्बो सवारीवेळी राजवाडा आवारात 300 पेक्षा कमी जणांची उपस्थिती असावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
दिवाळीच्या कालावधीत फटाके विक्रीसाठी संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी. लोकवस्तीपासून दूरवर, खुल्या मैदानात फटाके विक्रीसाठी संबंधित प्राधिकरण, खात्याने परवानगी द्यावी. एका फटाके दुकानापासून दुसऱया दुकानात किमान 6 फूट अंतर असावे. दुकान व परिसरात दररोज सॅनिटायझेशन करावे. फटाके खरेदी करणाऱयांनी मास्क, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. फटाके खरेदीवेळी गर्दी टाळावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.