सिटीझन कौन्सिलची रेल्वे खात्याकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असून अनेक दृष्टीने सोयीचा ठरतो. त्यामुळे हॉलिडे स्पेशल रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी सिटीझन कौन्सिलने केली आहे. सदर मागणीचे निवेदन कौन्सिलतर्फे बेळगाव रेल्वेस्टेशनचे व्यवस्थापक यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव हे अनेक दृष्टिने मध्यवर्ती शहर मानले जाते. येथे विद्यापीठ आणि अनेक शिक्षण संस्था आहेत. बेंगळूर, हैदराबाद, पाँडिचेरी, पुणे, अहमदाबाद, चेन्नई व गोवा येथे जाण्यासाठी बेळगावकर रेल्वे प्रवासाला पसंती देतात. कोरोना काळातही सर्वाधिक पसंती रेल्वे प्रवासालाच दिली जात आहे. आता दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. त्यासाठी रेल्वे फेऱयांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
बसचे तिकीट दर भरमसाट वाढविण्यात आल्याने रेल्वे प्रवासाकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावबरोबर हुबळी-पुणे मार्गावरही हॉलिडे स्पेशल सुरू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांपासून सिटीझन कौन्सिलच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला बऱयापैकी यश आले आहे. या मागणीनुसार रेल्वेच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. त्याबद्दल कौन्सिलने रेल्वे विभागाचे आभारही मानले.
हुबळी एलटीटी रेल्वेला बेळगावसाठी किमान दोन बोगींची व्यवस्था करावी. कारण ही रेल्वे बेळगावकरांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. मात्र ती हुबळीवरून येत असल्याने बेळगावच्या प्रवाशांना बऱयाचवेळा जागा उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी दोन अतिरिक्त डब्यांची बेळगावच्या प्रवाशांसाठी सोय करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बेंगळूर आणि मुंबई ही दोन्ही शहरे महत्त्वाची आहेत. त्यामुळे या मार्गावर क्लोन ट्रेन सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
दसरा-दिवाळीसाठी हॉलिडे स्पेशल सुरू करणे गरजेचे आहे. गुरुवार दि. 14 ऑक्टोबर रोजी वायपीआर-बेळगाव, पुणे-हुबळी, शनिवारी बेळगाव-वायपीआर, हुबळी-पुणे, सोमवार दि. 18 रोजी वायपीआर-पुणे, बुधवार दि. 3 नोव्हेंबर रोजी वायपीआर-बेळगाव, पुणे-हुबळी, शनिवार दि. 7 रोजी बेळगाव-वायपीआर, हुबळी-पुणे, सोमवार दि. 8 नोव्हेंबर रोजी वायपीआर-पुणे अशा विशेष रेल्वे सोडाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
नूतन व्यवस्थापकांचा सत्कार
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापकपदी नागराज यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना बेळगाव परिसराचा मोठा अनुभव आहे. त्यांचा सत्कार सिटीझन कौन्सिलच्यावतीने करण्यात आला. सध्या रेल्वेस्थानकाचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. मार्चपर्यंत रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण होईल, याबद्दलही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रेल्वे कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मागण्यांबाबत चर्चाही करण्यात आली. यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी, एस. सुरेश हे उपस्थित होते.