शहर परिसरात उत्साहाचे वातावरण, मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, असे म्हटले आहे. दसरा म्हणजे सोन्याच्या अर्थात आपटय़ाच्या पानांची देवाण-घेवाण करण्याचा सण. आपटय़ाची आणि शमीची पाने, झेंडुच्या माळा यानेही बाजारपेठ फुलून गेली आहे. दसऱयानिमित्त खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गुरुवारी खंडेनवमी होती. त्यामुळे ऊस तसेच फुले खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.
दसऱयाला सोनेही खरेदी केली जाते. यामुळे सराफी पेढय़ांही ग्राहकांच्या प्रतीक्षेत सज्ज आहेत. सोन्याचा दर वाढलेला असला तरी यंदा खरेदी तेजीत होईल, असा सराफांचा अंदाज आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दसरोत्सव सणावर निर्बंध आले होते. त्यानंतर आता काही अंशी कोरोना नियंत्रणात आल्याने खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
सराफी पेढय़ांबरोबरच इलेक्ट्रॉनिक शोरुम्स्, वस्त्रप्रावरणांची दालने, दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या शोरुम्स्, त्याचबरोबर मोबाईलच्या शोरुम्स्कडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. खरेदीवर ऑफर, सवलत, गिफ्ट हँपर, स्क्रॅचकार्ड अशी प्रलोभनेही ठेवण्यात आली आहेत.
चव्हाट गल्लीच्या पालखीला परवानगी
एकीकडे बाजारपेठ सज्ज असतानाच दुसरीकडे मंदिरांमध्ये दसऱयानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सीमोल्लंघन, रथोत्सव, सासन काठी मिरवणूक, मंदिरांच्या पालख्या हे तर बेळगावच्या दसरा उत्सवाचे वैशिष्टय़ असते. मात्र यावषी त्यावर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ चव्हाट गल्ली येथील पालखीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पालख्या सहभागी होणार नाहीत.
शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम
सण म्हणजे पक्वान्न ठरलेलेच. त्यामुळे श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, कालाजामुन, गुलाबजामुन, मांडे, पुरणपोळी, ही पक्वान्ने तयार मिळत असून अनेक कंपन्यांचे या पदार्थांचे टीन बाजारात उपलब्ध होते. ते खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली. दसऱयाला बेळगाव शहरात पारंपरिक महत्त्व आहे. बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने या पारंपरिक विधीचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 15 रोजी दुपारी 2 वाजता मराठी विद्यानिकेतन शाळेनजीकच्या शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे.
दसऱयाच्या निमित्ताने गुरुवारी विविध मंदिरांमध्ये विधीवत पूजन झाले. याचबरोबरीने घरोघरी दसऱयाची शस्त्रपूजा केल्यानंतर शुक्रवारी सोने म्हणजे आपटय़ाची पाने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. दसऱयाला आपटय़ाची पाने वाटून एकमेकाला शुभसंदेश देण्याची पद्धत आहे. ही पारंपरिकता दरवषी बेळगावकरांतर्फे जपली जाते. यावषीही या सणाची तयारी पूर्ण झाली असून शहर सज्ज आहे.
खंडेनवमीच्या पूजेला ऊसाचा मान असतो. शस्त्रांच्या समोर पाच ऊस विधीवतपणे पूजविले जातात. शेतकरी आपल्या अवजारांची तर कारागिर आपल्या हत्यारांची या खंडेनवमीला पूजा करीत असतात. या पूजेसाठी काकतीवेस, कलमठरोड, शहापूर, वडगाव रोड, बॉक्साईट रोड, कंग्राळी रोड, सांबरा रोड तसेच शहराच्या व उपनगरांच्या इतर भागांत ऊस विक्रीस ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली होती.
पावसानेही गुरुवारी उघडीप दिली. त्यामुळे खरेदीला उधाण आले होते. शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनताही खरेदीसाठी आली होती. बाजारपेठेमध्ये व्यावसायिकांनीही दुकाने सज्ज ठेवली होती. त्यामुळे खरेदी वाढल्याचे दिसून येत होते.