संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल : अनेक जणांवर बंदी नाही : पाकिस्तान जगासाठी डोकेदुखी
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तानात दहशतवादी आणि दहशतवादी संघटना सातत्याने वाढत आहेत. भारतीय उपखंडातील अनेक दहशतवादी संघटनांची धुरा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हातातच आहे. यात इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा यासारख्या दहशतवादी संघटना सामील असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील अनेक दहशतवाद्यांवर अद्याप संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी घालण्यात आलेली नाही.
एप्रिल आणि मे महिन्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी आयएसआयएल-के (इस्लामिक स्टेट इन इराक अँड लीवेंट-खुरासान) चा म्होरक्या अस्लम फारुखीला अटक केली होती. फारुखीला अब्दुल्लाह ओरकजई या नावानेही ओळखले जाते. काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ओरकजई हाच होता. या हल्ल्यात 25 शिखांचा मृत्यू झाला होता.
ओरकजई हा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचा रहिवासी आहे. फारुखी याच्यासह आयएसआयएल-केचा माजी म्होरक्या जिलाउल हक यालाही अटक करण्यात आली होती. तो देखील पाकिस्तानचाच नागरिक आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना अद्याप काळय़ा यादीत टाकण्यात आले नसल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या एनॉलिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीमच्या अहवालात नमूद आहे.
अल-कायदा संघटनेचा म्होरक्या पाकिस्तानी
भारतीय उपखंडात अल-कायदा ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या निम्रुज, हेलमंड आणि कंधार प्रांतातून चालविली जाते. सद्यकाळात ही संघटना तालिबानच्या अंतर्गत काम करत आहे. याचा सद्यकाळातील म्होरक्या ओसामा महमूद असून त्याचे जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत नाव नाही. अहवालानुसार या गटात बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानचे 150 ते 200 दहशतवादी आहेत. ओसामाला आसिम उमरच्या मृत्यूनंतर प्रमुखपद मिळाले होते.
पाकिस्तानशी जवळीक
दहशतवादी संघटनांशी असलेली पाकिस्तानशी जवळीक या अहवालातून स्पष्ट होते. पाकिस्तानी नागरिकच दहशतवादी संघटनांचे म्होरके आहेत. अफगाणिस्तानच्या 12 प्रांतांमध्ये अल-कायदा अद्याप सक्रीय आहे. याचा म्होरक्या अल-जवाहिरीने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. अफगाणिस्तानात अल-कायदाचे 400 ते 600 दहशतवादी असून त्यांचा हक्कानी नेटवर्कशी संबंध असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
टीटीपीच्या म्होरक्यावर युएनकडून बंदी
अफगाणिस्तानात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) दहशतवादी संघटना सक्रीय आहे. याचा म्होरक्या पाकिस्तानचा आमिर नूर वली मसूद आहे. मसूदला चालू महिन्यातच जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. तर मसूदचा सहकारी कारी अमजर आणि टीटीपीचा प्रवक्ता मोहम्मद खोरसानी यांच्यावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही.