ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश पोलिसांना संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा एक निनावी ईमेल काही जणांना आला होता, ज्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या ई मेल संदर्भात दिल्ली पोलिसांनी तत्काळ माहिती दिली आणि त्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला. विशेष म्हणजे या अगोदर होळीच्या दिवशी देखील दहशतवादी हल्ल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
दरम्यान, दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेनंतर राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला होऊ शकतो. ज्यानंतर दिल्लीमध्ये हाय सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलीसांना दहशतवादी संघटना तहरीक एक तालिबानकडून एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. जो उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सरोजनी नगर मार्केट येथे गस्त वाढवला आहे.
अनेक वृत्तवाहिन्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. दिल्ली पोलिसांची एक विशेष टीम या ईमेलची सत्यता आणि हा ईमेल कोणी पाठवला याची चौकशी करत आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या भागांत आणि शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आल आहे. उल्लेखनीय असे की, 2008 मध्येही अशाच प्रकारचे ईमेल आल्यानंतर दिल्लीमध्ये हशतवादी हल्ले झाले होते.